अहेरी:मंत्री पद मिळाल्यावर आपल्या भागासाठी कोट्यवधी रुपयांची निधी खेचुन आणून विकासकामांचा मुहूर्तमेढ रोवला. आज आपल्या परिसरात बरेच विकास कामे सुरू आहेत. एखादी काम हातात घेतले की ते पूर्ण करण्याची जबाबदारी पण मी घेतो.विकास कामांचे केवळ आश्वासन देत नाही,तर शब्द देतो आणि पाळतोही असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
सोमवारी २३ सप्टेंबर रोजी जिमलगट्टा येथील आयोजित जनसंवाद व आढावा बैठकीत ते बोलत होते.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,राकॉचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर,जेष्ठ नेते बबलू हकीम, कार्याध्यक्ष रियाज शेख,अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर बाबा आत्राम, सरपंच पंकज तलांडे,उपसरपंच वेंकटेश मेडी,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे,रेगुलववहीचे सरपंच ममिता नैताम, मरपल्लीचे सरपंच अरुण वेलादी, कैलास कोरेत,सांबय्या करपेत,बालाजी गावडे,संजय गजलवार,नारायण गजमवार, आनंदराव तलांडे, देचलीपेठाचे राजेश राजेश कुमरे,मोहन दुर्गे,दोडगेरचे जयवंत मडावी,गोविंद गावचे जगदीश दुर्गे,संतोष बोरकुट,रसपल्लीचे रंगय्या तलांडे,मेडपल्लीचे जयराम कुळमेथे, सिलमपल्लीचे रवींद्र कोरेत,वाघा गावडे,मलय्या आत्राम,संजय सडमेक आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना माझ्यासोबत राहून अनेकांनी प्रगती केली.मात्र,ऐन वेळेवर मला सोडून गेले.असे अनेक उदाहरण आहेत मात्र,अल्पावधीतच त्यांचा राजकारण संपुष्टात आला. मला जनतेचा आशीर्वाद आहे त्यामुळेच आमदार,राज्यमंत्री आणि आता कॅबिनेट मंत्री पदापर्यंत मजल मारता आली.आमदार म्हणून निवडून आल्यावर देशात कोरोनाने डोकं वर काढलं.त्यामुळे बरेच विकास कामांना ब्रेक लागला.आपल्या भागाचा विकास व्हावं,बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं,विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावं,येथील शेती सुजलाम सुफलाम होऊन माझा शेतकरी बांधव आर्थिक दृष्ट्या समृद्ध व्हावं यासाठी शिक्षण,सिंचन आणि रोजगार हे ब्रीदवाक्य घेऊन पुढे चाललो आहे.
आपल्या भागातील काही लोकं लिफाफे वाटून चमकोगिरी करतात.मला त्यात जायचं नाही.मंत्री पदाला शोभेल असे काम मी करत आहे.कधी विकास कामांचा गवगवा केला नाही.मात्र,सुरू असलेले अनेक विकास कामे पुढील कालावधीत पूर्ण झाल्यावर ते लोकांना आपोआपच दिसणार.तब्बल बाराशे कोटींच्या निधीतून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे,आदिवासी विध्यार्थ्यांना सुसज्ज इमारतीतून शिक्षण घेता यावं यासाठी कोट्यवधींची निधी खेचुन आणली,बरेच ठिकाणी शासकीय आश्रम शाळा व वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहेत.धान साठवणूक करण्यासाठी दुर्गम भागात गोडाऊन बांधकाम सुरू आहेत.काही गोडाऊन पूर्ण झाले.रेगुंठा,पेंटींपाका, महागाव,देवलमरी सारख्या ठिकाणी मध्यम उपसा सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आले.काही ठिकाणी प्रगतीपथावर आहेत.एवढेच नव्हेतर बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करण्यात आले आणि भविष्यात आणखी काही होऊ घातलेल्या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहेत.यासह सिमेंट रस्ते,नाली बांधकाम,इमारत दुरुस्ती असे कोट्यवधींची निधी देण्यात आली.या सर्व कामांचे आकडेवारी पाहिल्यास विरोधकांचे डोळे चक्रावतील.असे बोलून गेली पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा त्यांनी पाढाच वाचून दाखवला.
अगोदर मला भेटायला आय पास लागायचा आता कुठलाच पास लागत नाही.सर्वसामान्य माणूस थेट येऊन मला भेटत आहे.ज्यांना घडवलं त्यांनीच मला धोका दिला.आयुष्यात माझ्या वाट्याला अनेक संकटे आली मात्र खचून गेलो नाही.जनता माझ्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांचे चिमटे घेतले.आयोजित सभेत रवींद्र बाबा आत्राम,रियाज शेख,सांबय्या करपेत यांनी देखील मार्गदर्शन केले आणि मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना पुनश्च एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचा सूत्रसंचालन सुरेंद्र अलोने यांनी केले.
दरम्यान जिमलगट्टा येथे आगमन होताच परिसरातील नागरिकांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करत ‘धर्मराव बाबा आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणा देत जल्लोषात स्वागत केले.यावेळी जिमलगट्टा,रसपल्ली,शेडा,शिंधा,देचली,पेठा,गोविंदगाव,उमानूर, मरपल्ली,सुद्धागुडम,रेगुलवाही, मुडेवाही,कोंजेड,दोडगेर,मेडपल्ली,सिलमपल्ली, गुंडेरा,अर्कापल्ली आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वसामान्यांना सहकार्य करण्याचे निर्देश
कार्यक्रमात आलेल्या नागरिकांनी विविध समस्यांचे निवेदने दिली.ते स्वीकारून समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.यात प्रामुख्याने गडचिरोली साठी बससेवा आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली.यावेळी मंत्री आत्राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निर्देश दिले.
या आढावा सभेत तहसीलदार बालाजी सोमवंशी,गटविकास अधिकारी राहुल वरठे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.किरण वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी, तालुका कृषी अधिकारी संदेश खरात आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.