वरोरा – बैलपोळ्याच्या सणाचे औचित्य साधत सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी तालुक्यातील बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत सुरला या गावातील 40 शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप करून एक अभिनव उपक्रम राबवला आहे. बागायती शेतीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांनी शेतीव्यवसायासोबत उत्पन्न वाढवावे, अशी त्यांची संकल्पना असून, यामुळे गावातील शेतकरी अत्यंत आनंदित झाले आहेत.
सुरला हे छोटे गाव असून येथे शेतकरी कपास, तूर, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. यावेळी नागापुरे यांनी संपूर्ण गावाने बागायती शेतीचा अवलंब करावा, असा संदेश दिला. बैलजोडी आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना फणस, जांभूळ, लिंबू आणि जाम यांसारख्या फळझाडांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला पोलीस पाटील आकाश धगडी, माजी सरपंच माधुरी बदकी, सामाजिक कार्यकर्ता प्रवीण बदकी, उत्कृष्ट शेतकरी योगेश देसाई, अविनाश आमने आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.