वरोरा: शहरातील एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वरोरा शहरात सर्व धर्मांचे सण उत्सव एकत्रितपणे साजरे केले जातात. याच पार्श्वभूमीवर जिल्हा शांतता समिती सदस्य तथा माजी सभापती (बांधकाम, आरोग्य व पाणीपुरवठा) शेख जैरुदीन उर्फ छोटू भाई यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. या भेटीत येणाऱ्या सर्व सण उत्सवांसाठी प्रशासनाने नागरिकांना आवश्यक त्या सुविधा व सहकार्य पुरवावे, अशी मागणी केली.
शहरातील येणारे प्रमुख सण म्हणजे गणेश उत्सव आणि ईद मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंबर साहेब जयंती) यावर्षी एकत्र साजरे होणार आहेत. या उत्सवांमध्ये लहान मुलांना आणि नागरिकांना आनंदाने सहभागी होता यावे, यासाठी सर्व परवानग्या लवकर देण्यात याव्यात अशी विनंती छोटू भाई यांनी केली. विशेषतः अनंत चतुर्थी गणेशोत्सव विसर्जनाची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत देण्यात यावी, अशीही त्यांनी मागणी केली.
यावेळी प्रफुल जाधव, जावेद भाई आणि इतर सहकारीही उपस्थित होते. त्यांनी प्रशासनाने शासनाच्या नियमानुसार सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. छोटू भाई यांची ही भेट शहरात सण उत्सवांच्या यशस्वी आयोजनासाठी महत्त्वाची ठरली आहे.