गोंडपिपरी -(सुरज माडूरवार)
गोंडपिपरी तालुक्यातील पाणोरा येथील सार्वजनिक विहिरीत पती-पत्नीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, दिनांक 24 ऑगस्ट, शनिवारी घडली आहे. प्रकाश शरबत ठेंगणे (वय 30) आणि उषा प्रकाश ठेंगणे (वय 27) असे या दाम्पत्याचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा कोर्ट मॅरेज झाला होता आणि त्यानंतर ते आनंदाने एकत्र राहात होते.
प्रेमविवाहामुळे ते एकत्र येऊन आनंदी होते, परंतु आज काही कारणाने त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे पत्नीने प्रथम विहिरीत उडी घेतली आणि त्यानंतर तिच्या पाठीमागे नवऱ्यानेही उडी घेतली. घराशेजारील एका मुलाने हे दृश्य पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. गोंडपिपरी पोलिसांना गावकऱ्यांनी याबाबत माहिती दिली, मात्र अद्याप मृतदेह सापडले नाहीत. पती-पत्नीचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत. विहिरीत उडी मारण्याचे कारण अद्याप स्पष्ट नसून तपास सुरू आहे.