अहेरी: जिल्ह्याच्या दक्षिण भागात सर्वात मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या अहेरी आणि अल्लापल्ली येथे शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी अहेरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.त्यामुळे या दोन्ही शहरांना पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राज्यातील महिला,अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या विरोधात शनिवारी महाविकास आघाडीकडून (मविआ) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने या बंदला बेकायदेशीर ठरवत मविआला फटकारले. यानंतर मविआच्या नेत्यांकडून न्यायालयाच्या निकालाचा आदर राखून बंद मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले.मात्र,बंद मागे घेण्यात आला तरी मविआतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर शनिवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत तोंडाला काळ्या फिती बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन मुक आंदोलन करावे, अशा सूचना मविआ नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे यादरम्यान कुठलंही अनुचित प्रकार घडू नये, यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या नेतृत्वात अहेरी आणि आलापल्ली शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.दोन्ही शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांनी सकाळपासून चोख बंदोबस्त ठेवला असून या शहरांना आता पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अहेरी आणि आलापल्ली दोन्ही शहरात स्वतः पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे भेट देऊन बारकाईने नजर ठेवून आहेत.कुठलही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.