गडचिरोली:-घोट ते गोमणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे ताबडतोब दुरुस्ती करा, अन्यथा १५ जुलैपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले आहे की,चामोर्शी तालुक्यातील घोट ते मुलचेरा तालुक्यातील गोमणी (हम प्रकल्प) अंतर्गत येत असलेल्या रस्त्याचे मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.सदर रस्ता हे सार्वजनिक बांधकाम विभाग-२ गडचिरोली अंतर्गत येत असून कित्येक दिवसापासून या रस्त्याचे देखभाल न केल्यामुळे आज तारखेस या पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून येजा करणाऱ्यास अडचण निर्माण होत आहे. या खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले आहेत. गंभीर आजाराचे रुग्ण आणि गरोदर मातांना याच रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. १ जुलैपासून शाळा, महाविद्यालय सुरू होत असून विद्यार्थ्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण होणार आहे.
त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग-२ गडचिरोलीने या गंभीर बाबीची दखल घेऊन चांगल्या दर्जेची गिट्टी व मुरूमचा वापर करून रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच रोलरचा वापर करून सपाटीकरण करावे.१४ जुलै पर्यंत रस्त्याची पूर्णतः दुरुस्ती न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली,तसेच उपविभागीय अभियंता चामोर्शी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.