गडचिरोली: कुठलेही काम करत असताना ठरवून दिलेली एक कालावधी असते. मात्र संबंधित विभाग जर गाढ झोपेत असेल तर कंत्राटदार यात दिरंगाई करणारच. असाच काही प्रकार आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावर दिसून येत आहे. डांबरीकरणाचे काम करून महिना लोटून गेला तरी साईड बंबचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. त्यामुळे मुलचेरा रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आलापल्ली ते मुलचेरा रस्त्यावरील बोटलाचेरू फाट्यापासून ते पुढे आला पल्लीकडे ४ किलोमीटर पर्यंत डांबरीकरण करण्यासाठी शासनाने १९९.३७ लक्ष रुपयांची निधी मंजूर केली होती. जानेवारी महिन्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन देखील झाले. मात्र संबंधित कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग,आलापल्ली यांच्या दिरंगाईमुळे हे काम मे महिन्यात करण्यात आले.डांबरीकरणाचे काम पूर्ण होऊन महिना लोटून गेला तरी साईडबंबचे काम पूर्ण झाले नाही आणि सदर रस्ता अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना, ओव्हरटेक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
संबंधित कंत्राटदाराने डांबरीकरणाच्या कामाला विलंब केला त्यानंतर साईड बंब कामात देखील दिरंगाई केल्याने इकडे पावसाने हजेरी लावली.अश्यात एका बाजूला काही अंतरावर मातीयुक्त मुरूम टाकल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. सध्या या परिसरातील पावसाची रिप रिप सुरू असल्याने या ठिकाणी चार चाकी वाहन अडकण्याचे प्रमाण वाढले आहे.
आलापल्ली ते आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाले असून जड वाहनांचा वर्दळ असल्याने पर्यायी मार्ग म्हणून आलापल्ली ते मुलचेरा या मार्गाचा वापर केला जात आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ दिसत आहे.अश्यात डांबरीकरण झाल्यावर साईड बंब चे काम पूर्ण न झाल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आलापलीचे याकडे दुर्लक्ष होत असून संबंधित विभाग आणखी किती जीव जातपर्यंत वाट बघणार असा प्रश्न सर्वसामान्य कडून विचारला जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर साईड बंबचे काम पूर्ण करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.