पुलगाव -गरज नसलेल्या ठिकाणावर रस्ते निर्माण करण्याचे काम स्थानिक नगर परिषद प्रशासन करीत आहे. येथील इंदिरा मार्केट परिसरात सुस्थितीत असलेल्या रस्त्यावर आता पुन्हा सिमेंट काँक्रीटचा थर टाकून रस्त्याला उंच करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी परिसरातील व्यावसायिक प्रतिष्ठानात शिरणार असल्याच्या भीतीने जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला.
गेल्या 2 वर्षांपासून नगरपालिकांच्या निवडणुका नसल्यामुळे न प मध्ये प्रशासक सत्ता आहे.
प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचा कारभार अधिकारी हाताळत आहेत. शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून हे योग्यच आहे.पण
ज्या ठिकाणी रस्त्यांची फारशी गरज नाही, तेथे रस्ते तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणत्याही कारणाशिवाय या रस्त्यांच्या कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचार होत असल्याची चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
पुलगाव इंदिरा मार्केटमध्ये तयार करण्यात येत असलेला रस्ता खराब झाला नव्हता किंवा मोठे खड्डे त्यावर पडले नव्हते तरी त्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले.
खोदकाम न करता त्यावर लोखंडी चटई टाकून सिमेंट काँक्रीट चा चार ते पाच इंचापेक्षा जास्तीचा थर टाकून नव्याने रस्ता निर्माण केला जात आहे. त्यामुळे या रस्त्याची उंची वाढणार आहे.
काही दिवसात पावसाला सुरुवात झाल्यावर पावसाचे रस्त्यावर पडणारे पाणी या भागातील व्यावसायिक प्रतिष्ठानात शिरल्याने मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील निवेदन नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले.रस्त्याच्या निर्मितीबाबत येथील नागरिकांनी व व्यावसायिकांनी रोष व्यक्त केला. दिलेल्या निवेदनावर कुणाल देऊळकर ,हमीद अन्सारी, राजू अंबादे, शेखर जगनकर, पंकज अडकणे, वसंत अडकणे ,किसनराव कांबळे, अजय घोडेस्वार ,मारोतराव काकपुरे, अनिल मोटवानी ,नासिर खा पठाण, इरफान खान,ओम पंजवानी, चुन्नी सतिजा, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मार्केटच्या दुरुस्तीची गरज
येथे असलेल्या इंदिरा मार्केट या व्यापारी संकुलाच्या दुरुस्तीची गरज आहे.या संकुलाचे छत कमकुवत झाले असून पाणी गळत आहे. या भागाच्या सुशोभीकरणाकरिता सिमेंट विटा लावणे अत्यावश्यक आहे. सोबतच इतर मूलभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे असताना त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असून गरज नसताना रस्ता निर्मितीच्या कामावर अनाठायी खर्च केल्या जात असल्याची भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.