गडचिरोली: राज्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली होती हवामान विभागाच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मंगळवार (१९ मार्च) रोजी सायंकाळी कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलेली असतानाच काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांची माती झाली.
गडचिरोली जिल्ह्यात १७ ते १८ मार्च दरम्यान वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता वातावरणात बदल होऊन तापमान किंचित कमी झाले होते. मात्र 19 मार्च रोजी सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आले. दुपारच्या सुमारास अनेक भागात वादळी वारा व विजांचा कडकडाटसह पावसाच्या सरी बरसल्या त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले. आरमोरी तालुक्यातील वर्धा परिसरात दुपारी दोन वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने दाणादाण उडाली. पिकांचे नुकसान तर झालेच पण मोठ मोठी झाडे कोसळली. आरमोरी तालुक्यातील वडदा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली धान मका गहू उडीद मूग मिरची टोमॅटो या पिकांना याचा फटका बसला. काही ठिकाणी घरावर झाडे कोसळली सुदैवाने अप्रिय घटना घडली नाही. मात्र अवकाळी पावसाने अनेकांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्याच्या दक्षिण भागात सायंकाळच्या सुमारास मुलचेरा तालुक्यात तब्बल एक तास पाऊस झाला. वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने या ठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आले. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका लागवड केली जाते.हा मका पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले तर शेतशिवारात पाणीच पाणी बघायला मिळाला. वादळ वाऱ्यामुळे तालुक्यातील वीज गायब झाली होती त्यामुळे नागरिक हैराण झाले होते.
अहेरी तालुक्यात पावसाने रात्रभर झोडपले
सायंकाळच्या सुमारास कुठे हलक्या तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. मात्र मध्यरात्री अहेरी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती पहाटे पर्यंत या भागात दमदार पाऊस झाला. सध्या या परिसरात मोहफुल हंगाम सुरू आहे. वादळ वारा आणि पावसामुळे सर्वत्र गळून पडल्याचे दिसून आले. फुल वेचणीतून दुर्गम व अति दुर्गम भागात रोजगार मिळतो, यातून दरवर्षी मोठी उलाढाल होते. मात्र यंदा मोहफूल वेचणी हंगामालाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.