*बोरचांदली,फिस्कुटीत पाणी समस्या गंभीर*
मुल प्रतिनिधी
मुल तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे व गावांकरिता स्वच्छ पाणी मिळावे म्हणून जिल्हा परिषदेने बोरचांदली व 19 गावांकरिता जीवन प्राधिकरणाची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जवळपास पंधरा वर्षांपूर्वी कार्यान्वित केली. मात्र बोरचांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला ग्रहण लागल्याने पाच दिवसांपासून या योजनेचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
बोरचांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे बिल थकल्याने महावितरणाने विद्युत पुरवठा खंडित केला. त्यामुळे पाच दिवसांपासून 10 गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. परिणामतः दहा गावांत पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासनांविरुद्ध रोष व्यक्त केल्या जात आहे.
या योजनेची देखभाल व दुरुस्तीचे काम चंद्रपूर येथील कंत्राटदाराकडे आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या योजनेच्या देखभाल दुरुस्ती करिता लाखो रुपयांचा निधी देतो. मात्र कंत्राटदार या योजनेच्या देखभाल दुरुस्ती कडे पूर्णतः दुर्लक्ष करीत आहे. परिणामतः योग्य नियोजना अभावी या योजनेचा पाणीपुरवठा अनेकदा प्रभावित होतो. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. योजनेअंतर्गत बोरचांदली,फिस्कुटी, विरई,येरगाव,पिपरी दीक्षित, चकबेंबाळ,सितंळा,भेजगाव, येसगाव,कवडपेठ,आदी गावांचा समावेश आहे. या दहाही गावात सध्या स्थितीत थेंबभरही पाणी मिळत नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
बोरचांदलीत पाईपलाईन लिकेज् असल्याने दहा दिवस तर आता पुन्हा पाच दिवस पाणीपुरवठा ठप्प आहे. विरईतही हिच परिस्थिती असल्याने पाणी समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.