गडचिरोली: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,भामरागड अंतर्गत समाविष्ठ भामरागड व एटापल्ली तालुक्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी आदित्य जिवने यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.विशेष म्हणजे पहिल्यांदाच आश्रम शाळेतील विध्यार्थ्यांकरीता विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून दोन्ही तालुक्यातील २४ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी ४८ मॉडेल्स सादर केले.
सन २०२२-२३ या वित्तीय वर्षातील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या योजनेतून भामरागड प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या भामरागड,एटापल्ली या दोन तालुक्यातील ०८ शासकीय व १६ अनुदानित आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांकरिता शुक्रवार (९ फेब्रुवारी) रोजी आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह,एटापल्ली येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘आदिवासी समाज व जैवविविधता संवर्धन’ हा विषय देण्यात आला होता. या विषयावर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट मिळून तब्बल ४८ मॉडेल्स सादर केले होते.
सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी म्हणून आदित्य जिवने यांनी पदभार स्वीकारल्यावर पहिल्यांदाच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी देखील दिलेल्या विषयावर उत्तम असे मॉडेल्स सादर करत चांगला प्रतिसाद दिला. यावेळी पर्यावरण व जैवविविधता बद्दलची काळजी या प्रदर्शनामध्ये प्रखरतेने दिसून आली.विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून लोक बिरादरी अनुदानित आश्रम शाळा, हेमलकसाने प्रथम,भगवंतराव आश्रम शाळा, एटापल्लीने द्वितीय तर संत मानवदयाल आश्रम शाळा,चिचोडाने तृतीय क्रमांक पटकाविले.तर माध्यमिक गटातून शासकीय माध्यमिक आश्रम शाळा,तोडसाने प्रथम, लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसाने द्वितीय आणि भगवंतराव माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा एटापल्लीने तृतीय क्रमांक पटकाविले.सदर प्रदर्शनीचे गुणांकन राहुल ढबाले,प्राध्यापक कु.पी एन उईके,गृहापाल यांनी केले.
विज्ञान प्रदर्शनी मध्ये प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळेतील विध्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी आदित्य जिवने यांच्याहस्ते मानचिन्ह, प्रमाणपत्र व डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र असलेले अग्निपंख हे पुस्तक देण्यात आले.यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रोशना चव्हाण,कार्यालयीन अधीक्षक मनोज सयाम तसेच आदी कर्मचारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.