वैजापूर अर्जुन शिंदे – समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सासरे आणि जावयांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज सकाळी साडेसहा वाजता वैजापूरजवळ चॅनल क्रमांक ४९० जवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (क्रमांक डी.डी.०१ एन ९२७५) कारला (क्रमांक एम.एच. २७ डी.सी. ७७१४) धडक दिली. या अपघातात रामचंद्र चंदू मेठाणी (५५, रा. अमरावती) आणि नामदेव ढालूमल पोपटाणी (३८, रा. नंदुरबार) यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमण गुरु मुखदास टेकवाणी (३७) आणि दीपक ठाकरदास मेठाणी (३०) गंभीर जखमी झाले.
रामचंद्र मेठाणी यांच्या भावजयीचे नुकतेच निधन झाल्याने ते अस्थी विसर्जनासाठी नाशिकला जात होते. अपघातानंतर जखमींना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले, नंतर अधिक उपचारांसाठी अमरावती येथे हलवण्यात आले.
या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून रामचंद्र मेठाणी यांच्या मुलाच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील करीत आहेत.