गडचांदूर – शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी यांच्या विद्यमाने सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन बुधवारी पार पडले. शिबिरात रासेयोचे विद्यार्थी बांबू क्राफ्टचे प्रशिक्षण घेत असून यामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित होणार आहे.
उद्घाटनीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. आनंद अडबाले उपस्थित होते तर उद्घाटन संस्थेचे सचिव नामदेव बोबडे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंह, उपसरपंच प्रा. आशिष देरकर, ग्रामविकास अधिकारी धनराज डुकरे, ग्रामपंचायत सदस्य सूरज कुळमेथे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सलमा पठाण, नरेश मामीलवाड, आनंद पावडे, बापूजी पिंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, मतदार जनजागृती हे उपक्रम राबविले जात आहे. सोबतच विशेष उपक्रम म्हणून प्रशिक्षक राजू राणे यांच्या मार्गदर्शनात शिबिरार्थ्यांना कौशल्य विकास अंतर्गत बांबू क्राफ्टचे प्रशिक्षण मिळत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. माया मसराम यांनी मानले. सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यापीठ आपल्या गावी उपक्रमातील विद्यार्थी व शिबिरार्थी उपस्थित होते.