गडचिरोली: गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आव्हान शिबिरात आजच्या आठव्या दिवशी रोप रेस्क्यु टेक्निक याविषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक डी. आर. एफ च्या चमूद्वारा देण्यात आले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, वित्त व लेखाअधिकारी भास्कर पठारे ,रासेयो संचालक तसेच आव्हान २०२३चे समन्वयक डॉ. श्याम खंडारे ,इन्स्पेक्टर पंकज चौधरी, इन्स्पेक्टर सुशांत सेठी, धर्मेंद्र सवेदा उपस्थित होते. याप्रसंगी प्र- कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले ,राजभवनातून रासेयो स्वयंसेवकांसाठी आवाहन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या शिबिराचा लाभ स्वतःसाठी आणि समाजातील इतर लोकांसाठी विद्यार्थ्यांनी करायचा आहे असे ते म्हणाले.
प्रात्यक्षिकाद्वारे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर एका किंवा दोन इमारती मधून दोरी बचाव तंत्राचा वापर करून लोकांना कशाप्रकारे बाहेर काढता येईल. इमारतीत अडकलेल्या लोकांची मदत कशी करता येईल. याबाबत प्रात्यक्षिक सादर केले.
विद्यार्थ्यांचे करण्यात आले मूल्यांकन
या दहा दिवसीय आपत्ती व्यवस्थापन शिबीर आव्हान मध्ये सहभागी झालेल्या २२विद्यापीठातील १००० विद्यार्थ्यांचे आज एन. आर. एफ. च्या चमूने मूल्यांकन केले. विद्यार्थ्यांनी या दहा दिवसांमध्ये जे अवगत केले. ते त्यांना कितपत समजलं हाच या मुलांकनाचा उद्देश होता यातून उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक आणि उत्कृष्ट रासेयो स्वयंसेविका निवडण्यात येणार आहे.
कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
‘प्रत्येक यशस्वी व्यक्ती सकाळी लवकर उठतात, सकाळी लवकर उठणे हे यशाचे गमक आहे’, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले. गोंडवाना विद्यापीठामध्ये आयोजित ‘आव्हान ‘ मध्ये विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. याच अंतर्गत आज विद्यार्थ्यांना मन आणि शरीर सुदृढ राहावे यासाठी योगासनाने धडे देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘आव्हान २०२३’ अंतर्गत राज्यभरातील आलेल्या विद्यार्थ्यांना एनडीआरएफ चे अधिकारी गेल्या आठ दिवसांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देत आहेत. सकाळी व्यायामापासून या विद्यार्थ्यांची दिनचर्चा सुरू होते. आज या विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. बोकारे यांनी सांगितलं की, प्रत्येकाने सकाळी उठले पाहिजे, सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला अधिक वेळ मिळतो. तसेच योग केल्याने शरीर आणि मन सुदृढ राहते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी नित्यनेमाने योगासने करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तसेच आव्हान २०२३चे समन्वयक डॉ. श्याम खंडारे,सहसमन्वक डॉ. प्रिया गेडाम, स. प्रा. डॉ. स्नेहा वनकर, डॉ. नंदकुमार मेश्राम, डॉ. संजय डाफ, एनडीआरएफ अधिकारी उपस्थित होते.