गडचिरोली:गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने सुरू असलेल्या राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आव्हान शिबिरात आजच्या सहाव्या दिवशी दिवसभरात पूरपरिस्थितीत कसा बचाव करायचा, भूकंप, आग, यापासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण कसे करायचे याविषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक निरीक्षक पंकज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एन. डी. आर. एफ च्या चमूद्वारा देण्यात आले.
प्रात्यक्षिकाद्वारे एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर कशाप्रकारे आगीवर नियंत्रण मिळवुन आगीत अडकलेल्या लोकांची मदत करतात याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. यासोबतच विदयार्थ्यांनी स्वतः प्रात्याक्षिक करुन अनुभव घेताला.
या प्रशिक्षण शिबिरात इतर विद्यापीठांचे कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले असून दर दिवशी सत्राचे संचालन करण्याची जबाबदारी एका विद्यापीठाकडे असते. दररोज सकाळी व्यायाम आणि योगाने विद्यार्थ्यांच्या सत्राची सुरुवात होत असते. जेवणाच्या आधीही विद्यार्थी प्रार्थना करतात.
गडचिरोली शहरातील स्थानिक तलावाच्या पात्रात अनुभवला थरार
एन. डी. आर. एफ. चे अधिकारी यांच्या संपूर्ण टिमने पुर परिस्थिती उद्भवल्यास आपत्ती व्यवस्थापन व निवारण दल कशा पद्धतीने लोकांना मदत करतात याचे स्थानिक तलावावर प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले. यामध्ये बोटी, लाईफ सेव्हिंग जॅकेट व पीसीआर इत्यादी पद्धतीचा अवलंब करुन पुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरुप कशाप्रकारे बाहेर काढण्यात येते तसेच पूरपरिस्थितीत बोटीत कसे बसायचे, निरुपयोगी वस्तूंपासून बचावाची साधनं कशी तयार करायची याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला . भूकंप कसा येतो , आल्यानंतर काय करायचे , काय नाही करायचे याची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली .
अमृत बंग यांचे व्याख्यान
दारू पिणे म्हणजे कुल आणि फॅशन असे समजणारे मुर्ख आहेत, दारूमुळे आयुष्य उध्वस्त होते, असे प्रतिपादन ‘ निर्माणचे प्रकल्प प्रमुख तसेच सर्च संस्थेचे सहसंस्थापक अमृत बंग यांनी केले. गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती निवारण शिबीर ‘आव्हान २०२३’ मध्ये कालच्या सत्रात त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी देशात दररोज मृत्यु होणाऱ्यांपैकी २५ ते २९वयोगटातील २५टक्के मृत्यु दारू पिल्यामुळे होतात. गेल्या २० वर्षात ५५ टक्के दारूची विक्री वाढली आहे. दारूमुळे केवळ व्यक्तीचे नुकसान होत नाही तर समाज आणि देशाचेही नुकसान होते. त्यामुळे दारू पिणार नाही आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीशी लग्न करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अमृत बंग यांनी दिली. त्यांच्यासोबत आदिती पिदूरकर, ओजस कृष्णानी, साईराम गजेले, विशाल बंडीवार, प्रज्जल सोनालवार आदी उपस्थित होते.