गडचिरोली :- ओडिशातील जंगल परिसरातील खाणीत मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या उत्खननामुळे पारंपरिक अधिवास बाधित होऊन स्थलांतरित झालेला २३ रानटी हत्तींचा कळप २०२१ च्या शेवटी छत्तीसगडमार्गे गडचिरोलीच्या जंगलात दाखल झाला.
जिल्ह्यात रानटी हत्तीच्या कळपाने धुमाकुळ माजवला असून आता रानटी हत्तीने आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील महिलेला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कौशल्या राधाकांत मंडल रा. शंकरनगर (वय 67 ) असे मृतक महिलेचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा परिसरात दोन दिवसांपूर्वी रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकुळ माजवत घरांचे नुकसान केले होते.कसेबसे नागरिकांनी यावेळी आपला जीव हत्तीच्या तावडीतून वाचवला. दरम्यान 29 डिसेंबर च्या रात्री शंकरनगर येथील जंगलालगत शेतशिवारात असलेल्या घरात मंडल कुटुंब असतांना जवळपास
साडेदहा वाजताच्या सुमारास आपल्या परिसरात हत्ती आल्याचे त्यांना कळाले. हत्ती आपल्याला नुकसान पोहचवतील या भीतीने ते गावाकडे जाण्यास निघाले असता हत्तीने कौशल्या मंडल हिच्यावर हल्ला करून ठार केल्याचे कळते.
सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून संतापही व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आल्याचे कळते. रानटी हत्तीच्या दहशतीत नागरिक असून हत्तीचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान तालुक्यात आता वाघासह हत्तीच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहे.