चंद्रपूर :- बल्लारपूर शहराच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवण्याचा संकल्प ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ट्रक असोसिएशनतर्फे आयोजित भव्य प्रचार रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या रॅलीनंतर सभेत बोलताना मुनगंटीवार यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करत आरोग्य, शिक्षण, कृषी, सिंचन, क्रीडा, पर्यटन आणि रोजगार या क्षेत्रातील विविध कामांची माहिती दिली.
मुनगंटीवार म्हणाले, “बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करून मतदारसंघात विकासकामांना गती दिली आहे. शहरात सर्व जाती-धर्मातील नागरिकांचे कल्याण साधण्यासाठी काम केले असून, यापुढेही नागरिकांचा आशीर्वाद राहिला तर विकासाचे हे कार्य असाच चालू राहील.” त्यांनी ‘माता-भगिनींच्या आशीर्वादाचे महत्त्व’ अधोरेखित करतानाच, पुढील पाच वर्षांत बल्लारपूरातील कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा निर्धारही व्यक्त केला.
या प्रचार रॅलीमध्ये हजारो नागरिकांचा सहभाग होता. त्यांनी प्रकट केलेल्या विश्वासाने मुनगंटीवार उत्साही झाले आणि त्यांनी शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. अत्याधुनिक सैनिकी शाळा, सांस्कृतिक सभागृह, नगरपरिषद इमारत, क्रीडा संकुल, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय यांसारख्या सुविधांच्या निर्मितीमुळे बल्लारपूरचा सर्वांगीण विकास साधला गेला आहे.