चंद्रपूर :- घुग्घुस-वणी मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची सुपर व साधारण बस (सार्वजनिक बस) गेल्या एक वर्षा पासून बंद आहे.त्यामुळे शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, आजारी रुग्ण, छोटे व्यावसायिक, भाजीपाला उत्पादक, दैनंदिन प्रवासी यांना समस्येचा सामना करावा लागतो.
यामुळे सर्व सामान्य जनतेला खाजगी सेवा पुरविणाऱ्या वाहनांनी प्रवास करावा लागतो व जास्त प्रवास भाडे मोजावे लागते, विद्यार्थांना टेम्पो क्लब पासून शाळेत पायी चालत जावे लागते. अशा अनेक समस्या घुग्घुस-वणी मार्गावरील नागरिकांना सहन कराव्या लागतात.
तेव्हा नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन ना. सुधीर मुनगंटीवार मंत्री वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय, पालकमंत्री चंद्रपूर गोंदिया तसेच देवराव भोंगळे राजुरा विधानसभा प्रमुख तथा माजी अध्यक्ष जि.प. चंद्रपूर यांच्या अथक प्रयत्नांनी व विजय पिदुरकर माजी सदस्य जि. प. यवतमाळ यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याने तसेच विवेक बोढे प्रदेश उपाध्यक्ष, भाजयुमो महाराष्ट्र यांच्या परिश्रमाला यश प्राप्त झाले.
गुरुवार, २८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळचे अधिकारी किशोर कुळसंगे यांच्या उपस्थितीत उडानपुल बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस चालवून परीक्षण करण्यात आले.परीक्षण पूर्ण झाल्यानंतर लवकरच नियमित बससेवा सुरू होईल.