गडचिरोली :- अहेरी उपविभागात रेतीघाट नसल्याने सध्या रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून नदीपात्र पोखरण्यासाठी तस्करांनी चक्क रस्ता बनवला. एवढंच काय तर नदी पत्रात चक्क रस्ता तयार करून राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार भामरागड तालुक्यात समोर आला आहे. नुकतेच अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी भेट देऊन हा प्रकार डोळ्याने बघितल्यावर चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देताच एकच खळबळ उडाली आहे.
भामरागड तालुका मुख्यालयात इंद्रावती, पामुलगौतम आणि पर्लकोटा या तीन नद्यांचा संगम आहे. येथील बारमाही वाहणाऱ्या नदीमध्ये उत्तम दर्जाची रेती आहे. या रेतीवर आता तस्करांची नजर पडली असून नदीपात्र पोखरण्यासाठी चक्क रस्ताच तयार केला आहे. हा सगळा प्रकार त्रिवेणी संगमाजवळ सुरू असून घनदाट जंगलातून नदी पात्रात मुरुम टाकून चक्क रस्ता तयार करण्यात आला आहे. या नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू असल्याचा प्रकार लक्षात येताच अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी स्थानिक महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले तेव्हा रेती तस्करी साठी तयार केलेला रस्ता आणि पोखरलेला नदीपात्र बघून सर्वांचे डोळे चक्रावले. लगेच अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जेसीबी बोलावून तयार केलेला रस्ता तोडायला लावला. एवढेच नव्हेतर किती ब्रॉस रेती उत्खनन करण्यात आली आणि हे रेती तस्कर कोण ? याची योग्य चौकशी करण्याचे निर्देश संबंधित तहसीलदारांना दिले. त्यामुळे भामरागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे स्थानिक महसूल प्रशासन आणि वनविभागाच्या कार्यप्राणालीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यात विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बांधकाम केली जात आहेत. मात्र, याठिकाणी रेती घाटच नाही तर रेती येते तरी कुठून ? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता स्वतः अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन हा सगळा प्रकार उघडकीस आणल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
त्रिवेणी संगम परिसरातील नदी पत्रात जाण्यासाठी रस्ता बांधकाम केल्याचे आढळले. मात्र, याठिकाणी कुठलेच गाव नसताना हा रस्ता नेमका कशासाठी तयार केला असावा म्हणून प्रत्यक्ष पाहणी केली तेंव्हा हा सर्व प्रकार समोर आला. तालुका मुख्यालयात राजरोसपणे रेती तस्करी होणे ही अत्यंत गंभीर बाब असून लगेच मुरूम टाकून तयार केलेला रस्ता तोडण्यात आला व योग्य चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तहसीलदार यांना दिले आहे.
अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे