गोंडपिपरी : देश विकासाच्या धोरणनिर्मीतीत नामांकित विद्यापीठातील उच्चशिक्षीतांचा वाटा असतो. आपल्या दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यात प्रचंड क्षमता असूनही पुरेशा मार्गदर्शनाचा अभाव, मर्यादीत महत्वकांक्षा, न्यूनगंड, सामाजिक-आर्थिक अडचणी आदी आव्हानांमुळे ते शैक्षणिक प्रवाहापासून वंचित राहतात. आपल्या आदिवासीबहूल दुर्गम भागाच्या विकासासाठी देशाच्या पाॅलीसी मेकींग म्हणजेच धोरण निर्मीतीत आता ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे मत आंतरराष्ट्रीय चेव्हनिंग स्काॅलर ॲड.दीपक चटप यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जागृत बहुद्देशिय संस्था व विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून संविधान दिन ते गणतंत्र दिन या दोन महिन्यांच्या कालावधीत ॲड.दीपक चटप यांनी विदर्भात उच्चशिक्षणाची प्रेरणादायी शिक्षणयात्रा सुरू केली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील दहा महाविद्यालयात पोहोचून ॲड.चटप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर, विस्तार अधिकारी वैभव खांडरे, केंद्रप्रमुख रोहनकर, दुशांत निमकर, प्राचार्य बामनकर, प्राचार्य काटेखाये, प्राचार्य कासनगोट्टूवार, प्राचार्य डॉ.सुधा वासाडे, प्राचार्य पडशीलवार, प्रा.संतोष बांदूरकर, शिक्षणयात्रेचे समन्वयक अविनाश पोईनकर, बार्टीचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक सचिन फुलझेले, पत्रकार निलेश झाडे, प्रतिक पानघाटे, पवन मोटघरे आदी उपस्थित होते.
गोंडपिपरी येथील जनता महाविद्यालय, कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लक्ष्मणराव कुंदोजवार महाविद्यालय, कन्या विद्यालय तसेच शिवाजी विद्यालय विठ्ठलवाडा, कर्मवीर महाविद्यालय लाठी, जनता महाविद्यालय धाबा, राजे धर्मराव महाविद्यालय भंगाराम तळोधी, किसान विद्यालय वेडगाव, आक्सापूर विद्यालय आक्सापूर आदी दहा विद्यालय-महाविद्यालयात शिक्षणयात्रा अंतर्गत जवळपास २००० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व्हावा, या हेतूने ॲड.दीपक चटप यांनी केलेले मार्गदर्शन गोंडपिपरी तालुक्याला उच्चशिक्षणासाठी शैक्षणिक दिशा देणारे असल्याचे मत गटशिक्षण अधिकारी समाधान भसारकर यांनी व्यक्त केले. अविनाश पोईनकर यांनी शिक्षणयात्रेची भूमीका मांडली. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
•••
देश-विदेशातील या नामांकित विद्यापीठांची दिली माहीती
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, सोएस, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन, क्विन मेरी युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, ऑक्सफर्ड, केंब्रिज आदी विदेशातीतील नामांकित विद्यापीठे तसेच अझीम प्रेमजी विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, राष्ट्रीय विधी महाविद्यालय, निर्मला निकेतन काॅलेज ऑफ सोशल वर्क, इंडीयन स्कुल ऑफ पब्लिक पाॅलीसी, इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट, आयआयटी, आयआयएम, शिवनादर आदी देशभरातील नामांकित विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, नामांकित फेलोशीप याबद्दल माहिती देण्यात आली. पुढील काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या देश-विदेशातील नामांकित विद्यापीठात प्रवेशासाठी सहकार्य करणार असल्याचे ॲड.दीपक चटप यांनी सांगितले.
•••