गडचिरोली : ‘पीएलजीए’ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्लीजवळ कापडी बॅनर लावून इशारा दिल्याने दुर्गम भागात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून नक्षल प्रभावित क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे.
नक्षल्यांचे सशस्त्र संघटन पीपुल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या (पीएलजीए) स्थापना दिनानिमित्त नक्षलवादी दरवर्षी २ ते ८ डिसेंबरदरम्यान ‘पीएलजीए’ सप्ताह पाळतात. यादरम्यान ते हिंसक कारवाया करतात. त्यामुळे गडचिरोलीच्या नक्षलप्रभावित क्षेत्रात या काळात दहशतीचे वातावरण असते. आज ‘पीएलजीए’ सप्ताहाचा पहिलाच दिवस असून नक्षल्यांनी भामरागड तालुक्यातील मीडदापल्ली जवळ बॅनर लावले. यात त्यांनी हा सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सोबतच यंत्रणेला इशारा देखील दिला आहे. त्यामुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.