गडचिरोली /आनंद दहागावकर:– नुकतेच ऑगस्ट महिन्यात अहेरी येथे रुजू झालेले
अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे मागील काही दिवसांपासून अतिदुर्गम आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त भागात अचानक भेट
देऊन विविध योजनांचा आढावा घेत प्रत्यक्षात कामांची पाहणी
करत आहेत. रविवार (५ नोव्हेंबर) रोजी त्यांनी चक्क छत्तीसगड
सीमेवरील सर्वात शेवटच्या गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन थेट रुग्णांशी संवाद साधला .नुकतेच मागील महिन्यात ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी अगोदर बोटीचा वापर, नंतर सायकलचा प्रवास करत भामरागड तालुक्यातील झारेगुडाला भेट दिली होती. आता अचानक सुट्टीच्या दिवशी राज्याच्या शेवटच्या टोकावरील प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट दिल्याने सध्या जिल्ह्याच्या दक्षिण भागात अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांची जोरदार चर्चा आहे.
एटापल्ली तालुक्यातील सर्वात शेवटचे प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राची ओळख आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ उपकेंद्र आणि तब्बल ५६ गावांचा समावेश आहे. या भागातील
बरेच गावे पावसाळ्यात संपर्क क्षेत्रात असतात. विशेष म्हणजे, कंत्राटी आरोग्य कर्मचारी संपावर असल्याने सर्वच ठिकाणी कामकाज कोलमडले आहे. त्यामुळे दुर्गम परिस्थितीचा आढावा घेऊन विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी अपर जिल्हाधिकारी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली.
यावेळी त्यांनी येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णाशी संवाद साधून येथील आरोग्य अधिकारी नितेश वडे यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली.
रुजू झाल्यापासून ते अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात सहज भेट देऊन शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध कार्यालयात शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेत थेट जनतेत जाऊन चर्चेच्या माध्यमातून समस्या जाणून असल्याने दुर्गम भागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
एवढेच नव्हेतर अवैध उत्खनन विरोधातही त्यांनी कारवाईचा बडगा उगारला असून १५ दिवसांत अवैध रेती तस्करी करणाऱ्या ७ ट्रॅक्टरवर कारवाई केली. केवळ छोटी मोठी कारवाई न करता त्यांनी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी एका खासगी कंपनीवर नुकतेच मोठी कारवाई करत तब्बल ९० लाखांचा दंड ठोठावण्याचे निर्देश दिले. अश्या कारवाईने आणि अचानक दुर्गम भागात देणाऱ्या भेटीमुळे परिसरात त्यांनी वेगळीच
ओळख निर्माण केली आहे.