दोन पक्षातील वाद आला चव्हाट्यावर….
देवळी( वर्धा ) -:देवळी तालुक्यातील सोनेगाव बाई येथे ग्राम पंचायत सदस्य सातव याला मारहाण केल्याप्रकरणी देवळीचे आमदार रणजित प्रताप कांबळे यांच्यावर देवळी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीने आणलेल्या निधीचे परस्पर भूमिपूजन करण्याचा सपाटा आ. रणजित कांबळे यांनी लावला आहे.त्यात खासदारांसह निधी आणणार्या स्थानिक भाजपा पदाधिकार्यांनाही डावलेले जात असताना 3 वर्षांपूर्वी झालेल्या भूमिपूजनाचे अद्याप काम सुरू न झाल्याने देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील ग्रामपंचायत सदस्याने आ. कांबळे यांना त्या रस्त्याविषयी विचारणा केली असता त्यांनी भाजपा पुरस्कृत ग्रा पं सदस्य गणेश सातव याला मारहाण केली होती. या संदर्भात सातव यांनी देवळी पोलिस स्टेशनमध्ये 4 रोजी तक्रार दिली असता त्यांनी गुन्हे दाखल न करता प्रकरणच चौकशीत ठेवले होते. भाजपाने काल पत्रकार परिषद घेऊन गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही पोलिस स्टेशनला घेराव घालू असा इशारा दिला होता. या संदर्भात पोलिस अधीक्षक हसन यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर आ. कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, बचाव करण्यासाठी सोनेगाव बाई येथील सरपंचाने काल देवळी पोलिसात सातव याने शासकीय कामात दारू पिऊन अडथळा आणल्याची तक्रार दिली होती. मात्र, तो बचाव फोल ठरत आ. कांबळे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या संदर्भात ठाणेदार पिदूरकर यांच्या सोबत संपर्क केला असता गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.