गडचिरोली:- गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या.गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्याच्या सीमेलगत छत्तीसगडमधील छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ नोव्हेंबरला उघडकीस आली.
गडचिरोली पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयातून तीन व्यक्तींची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची खळबळजनक घटना २ नोव्हेंबरला छत्तीसगडमध्ये उघडकीस आली. जिल्ह्याच्या सीमेवरील छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्याच्या छोटेबेठियापोलीस ठाण्याच्या हद्दीत हे थरारक हत्याकांड घडले.कुल्ले कतलामी (३५), मनोज कोवाची (२२) व डुग्गे कोवाची (२७, सर्व रा. मोरखंडी जि.कांकेर) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
घटनास्थळी पोलिसांना नक्षलवाद्यांचे पत्रक आढळून आले. त्यात हे तिघे महाराष्ट्र पोलिसांचे खबरी असल्याचा दावा केला आहे. गडचिरोलीतील नक्षलविरोधी अभियानच्या सी-६० पथकासाठी हे तिघे खबरी म्हणून काम करत होते, असा संशय होता. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून २ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कांकेर जिल्ह्यात नियोजित प्रचारदौरा होता. त्याआधीच माओवाद्यांनी तिघांची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. छत्तीसगड पोलिसांनी या हत्याकांडाबाबत तपास सुरू केला असून पंतप्रधानांनी कडक सुरक्षा यंत्रणेत नियोजित प्रचारदौरा केला. यावेळी फेरी काढून त्यांनी सभेला संबोधित देखील केले.