गडचिरोली: अहेरी तालुक्यातील येलचिल येथे अवैध मुरुम उत्खनन होत असल्याच्या माहितीवरून तहसीलदारांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली. यामध्ये १०४७.०१ ब्रास उत्खनन झाल्याचे निदर्शनास आल्याने याप्रकरणी अहेरी तहसीलदारांनी लॉयड मेटल्स व एनर्जी लिमिटेड, आलापल्लीला तब्बल ९० लाख ४ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
येलचिल येथे अवैध मुरुम उत्खनन करून वाहतूक करीत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाल्यानंतर १० ऑक्टोबर रोजी तहसिलदार अहेरी व तलाठी मोदुमाडगु यांनी मोक्यावर जाऊन घटनास्थळी पाहणी केली. परवानातील वाहतूक पासनुसार उत्खनन केलेल्या जागेचे मोजमाप केली असता, सदर गट क्र. २५ मधील अवैध उत्खननाचे एकूण परिमाण १०४७.०१ ब्रास झाले. याबाबत लॉयड मेटल्स व एनर्जी लिमिटेड, आलापल्ली यांचेकडे वरील ब्रास संदर्भात कोणतेही वाहतूक परवाना आढळून आला नाही. तसेच आदेशातील नमूद अटी व शर्तीचे उल्लगंन झाल्याचे दिसून आले. त्याअन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे नियम ४८ (७) व (८) चे सुधारनेस अनुसरून अनाधिकृत गौण खनिज उत्खनन संदर्भात जप्तीनामा, पंचनामा सादर केल्याने प्रकरण पंजीबद्ध करण्यात आले.
प्रकरणातील लॉयड मेटल्स व एनर्जी लिमीटेड आलापल्ली यांनी अवैध मुरुम उत्खनन करुन मुरुमाची वाहतुक करीत असताना वाहतूक परवाना नसल्यामुळे तसेच आदेशात नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने गौणखनिजाच्या बाजारमूल्याच्या पाचपट दंड रूपये ८३ लाख ७६ हजार व स्वामीत्व धनाची रक्कम रूपये ६ लाख २८ हजार २०० असे एकूण ९० लाख ४ हजार २०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.
१० ऑक्टोबर रोजी एटापल्ली तालुक्याच्या दौऱ्यावर असताना रस्त्याच्या कडेला शोल्डर फिलिंगसाठी मुरुमाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यावर अहेरीचे तहसीलदार सुनील सौंदाने, नायब तहसीलदार हमीद सय्यद आणि एटापल्लीचे तहसीलदार दिनकर खोत यांना पाचारण करून कार्यवाही करण्यासाठी सांगण्यात आले. तसेच या भागात कुठेही अवैध उत्खनन होणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
– विजय भाकरे, अपर जिल्हाधिकारी, अहेरी