सिरोंचा :-तालुक्यातील पातागुडम परिसरातील नागरिकांचा गचके देई खाचखळ्ग्यातून प्रवास अद्याप पक्के रस्ते निर्माण झाले नाहीत. या भागातील नागरिकांना कच्च्या व पायवाटेच्या रस्त्यानेच प्रवास करावा लागत आहे. अतिदुर्गम
कोर्ला ते पातागुडम या 10 कि.मी. रस्त्याची दैनावस्था झाली आहे. हा रस्ता पांदण खोलगट असून प्रवास करताना जणूकाही लहान ओढा किंवा नाला असल्याचाच भास होतो.
पावसाचे पाणी रस्त्यावरूच वाहत असल्याने नाला की रस्ता असा प्रश्न साहजिकच पडतो. एवढी गंभीर अवस्था असतानाही नवीन रस्ता बांधकामाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पातागुडम गावाला लागूनच इंद्रावती नदी आहे,नदीतून बारमाही पाणी वाहते.
नदीवरून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करणे आवश्यक आहे.उपसा सिंचन झाल्यास शेतकऱ्यांना धान पिकासाठी पाणीपुरवठा होईल. वनहक्कासाठी दावे सादर करूनही या भागातील अतिक्रमणधारकांना पट्टे मिळाले नाहीत. ही प्रक्रिया लवकर राबवावी, रमेशगुडम, किष्टव्यापल्ली,कोर्ला,पातागुडम रस्त्याचे बांधकाम करावे,
पिण्यासाठी नळ योजना कार्यान्वित करावी,पातागुडम ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पातागुडम, रायगुडम,पेंडालाया परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरींचा लाभ द्यावा, नवीन शौचालयांचे बांधकाम करावे, गुरांसाठी गोठ्यांचा लाभ द्यावा, शेळी व दुधाळ गटाचे वाटप करावे, नवीन घरकूल मंजूर करावे, निराधाराकंना संजय गांधी योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, अपंग, सिकलसेलग्रस्तांना योजनेचा लाभ दिल्यास सुलभ होईल. त्यादृष्टीने शासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र कुमरी सुनील जाकुला, पातागुडम येथील किरणकुमार दुर्गम, लक्ष्मीनारायण गोरगोंडा यांच्यासह नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, सातत्याने मागणी करूनही शासन सदर मागणीकडे दुर्लक्ष का करीत आहे, अशी खंतही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
◆पावसाळ्यात मार्ग होतो ठप्प
कोर्ला ते पातागुडम मार्ग कच्चा आहे. सदर मार्गाची झीज झाल्याने दरवर्षीच्या पावसात तो वाहून गेला. आता तो खोलगट झाला आहे. पावसाळ्यात येथूनच पाणी वाहते. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास मार्गावरील रहदारी ठप्प होत अनेकदा ही स्थिती निर्माण होते.चिखलातूनच नागरिक प्रवास करतात. त्यामुळे सदर भागांचे खडीकरण होणे आवश्यक आहे.