आलापल्ली :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जिल्हयात आयुष्मान भव ही आरोग्यविषयक मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात आयुष्मान भव मोहीमेला सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ कन्ना मडावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण वानखेडे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार पंकज नौनुरवार होते.
या वेळी डॉ.विशाल येरावार, डॉ. लोचन श्रीखंडे, मनीषा कांचनवार,शुभांगी वाडके तसेच तालु्यातील आशा वर्कर आदी उपस्थित होते.
मोहिमेअंतर्गत तालुक्यातील १० किशोवयीन युवतींचे विविध आरोग्य समस्याचे तपासणी यावेळी करण्यात आले.
तालुक्यातील सर्व वयोगटातील नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी या मोहिमेअंतर्गत सर्व आबालवृद्धांच्या आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येणार आहे.
आयुष्मान आपल्या दारी ३.० या मोहिमेमध्ये तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून आयुष्मान कार्डाचे वितरण करण्यात येणार आहे. आयुष्मान सभा उपक्रमामध्ये आरोग्यविषयक सेवा, सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मेळावे घेण्यात येणार आहे. आयुष्मान कार्ड व आभा कार्ड याबाबत जनजागृती आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण व क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. आयुष्मान मेळावा अंतर्गत मधुमेह, ताणतणाव, रक्तदाब, विविध प्रकारचे कॅन्सर, कुष्ठरोग, क्षयरोग, कुपोषण, नेत्रचिकित्सा इत्यादी बाबत जनजागृती करणे आणि आयुष्मान भारत आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर दर आठवडयाला सलग चार आठवडे तपासणी करण्यात येणार आहे.
या मोहिमेदरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक आरोग्य सेवा, आयुष, मानसिक आरोग्य, वाढत्या वयातील आजार, परिहारक उपचार, मौखिक आरोग्य, नेत्र, कान, नाक व घसा यांचे आरोग्य, समुपदेशन सेवा तसेच योगा, वेलनेस उपक्रम, मोफत औषधी, प्रयोगशाळा तपासणी व टेलीकन्सलटेशन सेवा देण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्व अंगणवाडीतील मुले व प्राथमिक शाळेतील मुलांची आरोग्यविषयक तपासणी या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत मुलांची ३२ सामान्य आजारांची तपासणी आणि उपचार करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास या मुलांच्या जिल्हास्तरावर शस्त्रक्रीया करण्यात येणार आहे. त्यांना आवश्यक उपयुक्त साहीत्य देखील देण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व नागरीकांनी या आयुष्मान भव मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले आहे.