भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती तालुका काँग्रेस कमेटीच्या उपाध्यक्षपदी घोडपेठ येथील सक्रिय कार्यकर्ते अशोक येरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार भद्रावती – वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली. स्थानिक सेलिब्रेशन सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, काँग्रेस कमेटीचे वरीष्ठ नेते विनोद दत्तात्रय, तालुकाप्रमुख प्रशांत काळे,शहरप्रमुख सुरज गावंडे आदींची यावेळी उपस्थिती होती. अशोक येरगुडे हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. ते धार्मिक वृत्तीचे असून घोडपेठ येथील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचित आहेत. घोडपेठ तथा परिसरातील अनेक गावांमध्ये यांचा दांडगा जनसंपर्क आहे. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. त्यांच्या दांडग्या जनसंपर्काचा फायदा काॅंग्रेस पक्षाला होईल असा विश्वास सामान्यांमध्ये व्यक्त केला जात आहे.