भंडारा:संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशना दरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी आज ९ ऑगस्ट रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत वंदे भारत गाडीला भंडारा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासह इतर अन्य महत्त्वपूर्ण मागण्या मंत्री महोदयांकडे करून त्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
खासदार सुनील मेंढे यांनी या भेटीत भारतीय बनावटीच्या नागपूर बिलासपूर या २०८२५ व २०८२६ वंदे भारत गाडीला भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी मंत्री महोदयांकडे केली. सोबतच या मार्गावरून जाणाऱ्या काही महत्त्वपूर्ण सुपरफास्ट गाड्यांना भंडारा, तुमसर आणि गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासोबतच काही गाड्यांचे विस्तारीकरण करण्या संदर्भात विनंती केली.
या मागण्यांच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्याच्या प्रयत्न करू असे सांगून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी खासदार सुनील मेंढे यांच्याकडून सुरू असलेल्या रेल्वे/रेल्वेस्थानक विषयक कामांचे कौतुक केले.