गोंदिया: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासंदर्भात खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची भेट घेत निमंत्रण दिले. यावेळी मंत्री महोदयांनी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आश्वासनही दिले आहे.
सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची संसद भवनातील कार्यालयात भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी गोंदिया जिल्ह्यातील कुडवा येथे निर्माण केल्या जाणाऱ्या गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण पत्राद्वारे मंत्री महोदयांना दिले.
या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आपल्या शुभहस्ते व्हावा, ही इच्छा करून आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून 10 ते 20 सप्टेंबर दरम्यान होऊ घातलेल्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहावे असा आग्रह खासदारांनी मंत्री महोदयांकडे धरला. यावेळी मंत्री मनसुख मांडवीय यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले..