वरोरा :- चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण देश हळहळला. वरोरा येथे अंतिम संस्कार करण्यात आले. काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी वरोरा येथे खा. बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आणि अंत्ययात्रेत सहभागी झाले. बाळू धानोरकर यांच्या परिवाराचे त्यांनी सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी त्यांनी आपली शोक-संवेदना व्यक्त केली.
“चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर या तरुण आणि तडफदार नेत्याचे निधन हे धक्कादायक आहे. त्यांच्या वडिलांचे चारच दिवसांपूर्वी निधन झाले होते. आम्ही दोघे 2014 मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सोबत काम केले आहे. माझे ते एक चांगले आणि जवळचे मित्र होते. ते लोकसभेतील महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. सामान्य जनतेला आणि बहुजन समाजाला त्यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. दांडगा जनसंपर्क आणि समाजासाठी काही चांगले करण्याची प्रबळ इच्छा, यामुळे ते लोकप्रिय होते.
ऐन उमेदीच्या काळात त्यांचे अकाली निधन सर्वांनाच अस्वस्थ करणारे आहे. एक कर्तव्यदक्ष, सामाजिक जाणीव असलेला नेता, धडाडीचा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. माझा एक चांगला मित्र काळाने हिरावला”, अशी शोक-संवेदना माजी आमदार डॉ. आशिष. देशमुख यांनी व्यक्त केली.