वरोरा : केंद्रीय निवडणूक आयोग हे केंद्र शासनाच्या इशाऱ्यावर चालणारी कटपुतली बनली आहे. यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह काढून शिंदे गटाला देण्याचे पाप केले असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्या निमित्त वरोरा येथे आयोजित शिवगर्जना मेळाव्याचे औचित्य साधून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, तालुका प्रमुख नंदू पढाल, कंत्राटी कामगार सेना अध्यक्ष हनुमान ठेंगणे ,माजी नगरसेवक किशोर टिपले, विभाग प्रमुख आशिष ठेंगणे , हरिभाऊ वैद्य, आशिक चिकटे या पदाधिकाऱ्यांनी मुंडन केले.