गडचिरोली:-सध्या विद्यार्थ्यांचा कल हा वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्राकडे जास्त आहे. अश्या परिस्थिती गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील तनिष विधी क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतो ही खूप महत्वाची बाब आहे. तनिषची देशातील नामांकित आय. एल. एस विधी महाविद्यालय, पुणे येथे निवड झालेली आहे.
तनिष हा मूळचा अहेरी तालुक्यातील आलापल्ली गावचा. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे स्वगावीच झाले. पुढे विज्ञान शाखेत प्रवेश न घेता कला शाखेतून तो बारावी उत्तीर्ण झाला. शिक्षण सुरु असतांना त्याने विधी क्षेत्रात जाण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या परीक्षांचा अभ्यास करत होता त्यातूनच त्याला हे यश मिळालेलं आहे. वडिलांचे छत्र हरपल्याने तनिषची आई सरिता सिडाम यांनी शेती, मजुरी करुन त्याच्या शिक्षणाची जबाबदारी हाती घेतली.
तनिष म्हणतो की, आमच्या क्षेत्रातील आदिवासी समाजाला अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. त्यासाठी कोर्टात जायचे असल्यास कधी वकील भेटत नाहीत तर कधी वकिल भेटले तर वेळेवर पुरेसा पैसा सुद्धा राहत नाही. अश्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आज एका अभ्यासू, उच्च शिक्षीत, तरुण वकिलांची गरज आहे. या सगळ्यांचा विचार करता मी हे क्षेत्र निवडले आहे.
आय. एल. एस विधी महाविद्यालयाला मोठा शैक्षणिक वारसा आहे. देशाचे माजी सरन्यायाधीश न्यामूर्ती यशवंत चंद्रचूड, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण व शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या विद्यालयाचे विद्यार्थी राहिलेले आहेत. अश्या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेऊन तनिष नक्कीच स्वतः सोबत समाजाला घडविण्याचे काम करेल असे अॅड. बोधी रामटेके म्हणाले.