विलास मेश्राम वणी – वाघाने केलेल्या हल्ल्यात जनावरे चारण्यासाठी शेतात गेलेला गुराखी ठार झाला. ही घटना सोमवार (ता.२८) सकाळी उघडकीस आली.ही दुसरी घटना घडल्याने सर्वत्र भीतीचे सावट पसरले आहे. रामदास जगन्नाथ पिदूरकर (वय ६०, रा. कोलार पिंपरी) असे मृताचे नाव आहे. वणी तालुक्यात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात २ नागरिकांचे बळी गेले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी (ता१०नोव्हेबर) भुरकी येथील अभय मोहन देऊळकर हा युवा शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार झाला होता.
वणी वनपरिक्षेत्र वनविभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील कोलार पिंपरी जंगलात रामदास पिदुरकर हे जनावरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, जनावरे चारून गावाकडे परत येताना रविवारला सायंकाळी पाच वाजतादरम्यान अचानक नरभक्षक वाघाने रामदास यांच्यावर हल्ला केला.रामदास यांना वाघाने घनदाट झुडपामध्ये ओढत नेले. गावकऱ्यांनी रविवारला सायंकाळी शोध घेतला असता शोध लागला नसल्याने पुन्हा सोमवार दि.२८ नोव्हेबर रोजी सकाळी दरम्यान, रामदासचा शोध घेतला असता कोलार पिंपरी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे दुसरा बळी गेला तरी वनविभागाकडून नरभक्षक वाघाला पायबंद घालण्यात आले नसून कठोर पावले उचलली जात नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. जंगलात पिंजरे, कॅमेरे, मचाणी लावूनही नरभक्षक वाघाला पकडण्याचे आव्हान वनविभागाला पेलता आले नाही