अहेरी:- तालुक्यातील कमलापूर वन परिक्षेत्रातील कोलामार्का राखिव संवर्धन क्षेत्र हे अभयारण्य म्हणुन घोषीत झालेले असुन सदर क्षेत्र हे रानम्हशी करीता प्रसिध्द आहे. कोलामार्का क्षेत्रात नैनगुडम, चिटवेली, तोंडेर, चिंतारेव, भंगारामपेठा, दामरंचा, कुर्ता या गावांचा समावेश आहे. सदर गावातील लोकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी 04 नोव्हेंबर रोजी मौजा भंगारामपेठा येथे सिरोंचा वनविभागातर्फे वाटर फिल्टर वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अयोजन सिरोंचाचे उपवनसंवरक्षक पुनम पाटे (भा.व.से.) यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले होते.यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणुन श्री वरुण (भा.व.से.) उपविभागीय वन अधिकारी अहेरी,वनविभाग सिरोंचा, व्हि.एस.भोयर वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापुर,दामरंचाचे सरपंच किरण कोडापे,माजी पंचायत समिती सदस्यराकेश पनेला,माजी संरपंच जे.टी.मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जवळपास 250 नागरिकांना वॉटर फिल्टर वाटप करण्यात आले.यावेळी नैनगुडम, चिटवेली, तोंडेर, चिंतारेव, भंगारामपेठा, दामरंचा, कुर्ता या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी निरोगी आरोग्यासाठी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वन विभागामार्फत विविध उपक्रम घेऊन या परिसरातील नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती दिली.त्याचप्रमाणे वनांचे व वन्यजीवांचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले.वाटर फिल्टर वाटप करून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून कोलामार्का राखीव संवर्धन क्षेत्रातील 1000 कुटुंबाना वाटर फिल्टर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही एस भोयर यांनी दिली आहे.सदर कार्यक्रम यशस्वीतेकरित्या वनकर्मचारी तसेच गावकऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.