चंद्रपूर पोलिस विभागात यापूर्वी अनेक तक्रारी; चौकशीच्या नावावर केवळ फार्स
सीबीआय चौकशीची स्थानिकांची मागणी; कोळसा चोरीत मोठे मासे सापडण्याची शक्यता
चंद्रपूर/आशिष घुमे :- भद्रावती तालुक्यातील बरांज स्थित कर्नाटक एम्टा खुली कोळसा खाण ही तिच्या स्थापनेपासूनच वादातीत आहे. खाण सुरू झाल्यापासून अनेक अनियमितता या खाणीत दिसून आल्या. देशभरात उघडकीस आलेल्या कोळसा घोटाळा प्रकरणात ही खाण सापडली व बंद पडली. तब्बल सहा वर्षे ही खाण बंद राहिली. या दरम्यान खाणीतील लाखो टन कोळसा चोरीला गेला. यात जिल्ह्यातील मोठमोठ्या व्यक्तींच्या नावावर शंकेची सुई गेली. जिल्ह्यातील पोलिस विभागाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर कोळसा चोरीची चौकशी करण्याची घोषणा केली. मात्र चौकशीच्या नावावर केवळ फार्स झाला.
सुप्रीमकोर्ट च्या सप्टेंबर २०१४ च्या आदेश्यानुसार १ एप्रिल २०१५ ला सदर खाण बंद झाली. ती पुन्हा १ डिसेंबर २०२० ला चालू झाली. मात्र अद्यापही या खाणीत कोळसा चोरी सुरू आहे. नुकतीच या खाणीत कोळसा चोरीची घटना घडली. काल (दि.५) ला स्थानिक भोजवार्ड येथील रहिवासी वैभव मनोहर पिंपळकर (२९) यांनी तालुक्यातील बरांज स्थित एम्टा कोळसा खदान येथून कोळसा चोरी झाल्याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. वैभव पिंपळकर हा या खाणीत काटाघर निरिक्षक म्हणुन नोकरी करतो. एम्टा कोळसा खदान मध्ये येणा-या सर्व गाड्या दगडी कोळसा भरून माजरी साईडींगकडे खाली करण्याकरीता जातात. त्यामुळे काही टिपर व ट्रकचे नंबर पिंपळकर यांना माहित आहेत. कोळसा भरण्याकरिता टिपर व ट्रक हे एम्टा कोळसा खदानीत जावुन गाडीत कोळसा भरून परत माजरी सायडींगकडे जातांना त्यांना कोळसा भरल्याची पावती देण्यात येते. गाडी कोळसा खाली करण्याकरीता माजरी सायडींगवर गेल्या नंतर त्याची तीथल्या रजिस्टरवर नोंद करून पावतीवर स्टॅम्प मारून सही दिल्या जाते. सदर पावती गाडी खाली करून परत आल्यावर एम्टा कोळसा खदान येथील काटाघर मधे दाखल करावयाची असते.
दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी पिंपळकर हे सकाळी ९ वाजता एम्टा कोळसा खदान वरील काटाघर येथे नोकरी वर गेले व दिवसभर तेथे राहुन सायकांळी ६ वाजता भद्रावती येथे घरी परत आले. रात्रो अंदाजे १०:३० वाजता जेवन करून पिंपळकर हे वैयक्तीक कामा करीता स्थानिक टप्पा चौकात गेले असता, तिथे टिपर क्र. एम.एच. ३४ ए.बी. २४३९ या गाडीत कोळसा भरून वरोरा ते चंद्रपुर दिशेने ही गाडी जातांना दिसली. सदर गाडीचा संशय आल्याने पिंपळकर हे लगेच एम्टा कोळसा खदान येथील काटाघर येथे गेले व तिथे टिपर क्र. एम.एच. ३४ ए.बी. २४३९ या गाडीची चौकशी केली असता, दि. ५ नोव्हेंबरला अंदाजे १२:१५ वाजता दरम्यान टिपर क्र. एम.एच. ३४ ए.बी. २४३९ हि गाडी एम्टा कोळसा खदान काटाघर येथे दिसुन आली. तेव्हा सदर गाडीकडे जावुन गाडीमध्ये बसुन असलेला चालक यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव नगाजी निखाडे असे सांगीतले. गाडीचे चालकाकडे सदर गाडी हि आतापर्यंत कोठे होती बाबत विचारले असता सदर चालकाने गाडी ब्रेक डाउन होती असे सांगीतले. सदर चालकास पावती दाखविण्यास सांगीतले तेव्हा चालकाने पावती दिली. सदर पावती पाहीली असता सदर पावती वरील कोळसा लोडींग वेळ रात्री ७:०३ असा दिसला. तसेच सदर पावतीवर २२,८८० किलो दगडी कोळसा अंदाजे कि. २,७०,००० रुपयेचा दिसुन आला. सदर पावतीवरील स्टॅम्पची पडताळणी केला असता सदर स्टॅम्प अस्पष्ट दिसला. या बाबतची माहीती वरीष्ठ अधिकारीना देवुन सदर टिपर बाबत माजरी सायडींग कडे चौकशी केली असता नमुद क्रमांकाचा टिपर हा माजरी सायडींग येथे खाली करण्याकरीता आला नसल्याचे समजले. त्यामुळे सदर चालकाने दिलेली पावती पिंपळकर यांनी ताब्यात घेतली. व गाडी चालकास टिपर काटाघर एम्टा कोळसा खदान येथेच थांबवण्याची सुचना दिली. याबाबत (दि.५) ला सकाळी ९:३० वाजता दरम्यान एम्टा कोळसा खदान काटाघर येथे जावुन पुन्हा वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देवून टिपर क्र. एम.एच. ३४ ए.बी. २४३९ ह्या गाडी बाबत चौकशी केली असता सदर गाडी चालकाने एम्टा कोळसा खदानी मथुन रितसर २२,८८० किलो दगडी कोळसा अंदाजे किंमत २,७०,००० रुपयेचा दगडी कोळसा त्याचे गाडीमध्ये भरून माजरी सायडींगवर खाली करावयाचे माहित असताना सुध्दा सदर गाडी चालकाने टिपर मधील वरील किमतीचा कोळसा चोरून नेऊन दगडी कोळश्याची विल्हेवाट लावली, अशी तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला पिंपळकर यांनी दिली आहे.
कोळसा चोरीची तक्रार दाखल झाली म्हणून अद्यापही कोळसा चोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले. मात्र अशा अनेक चोरीच्या घटना या खाणीत झाल्या आहेत. त्यामुळे सीबीआय मार्फत या सर्व कोळसा चोरी प्रकरणाची चौकशी केल्यास जिल्ह्यातील मोठे मासे गळास लागण्याची शक्यता आहे.
कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) च्या मालकीची ही कोळसा खाण आहे. या खाणीत पूर्वीची जॉईन्ट वेंचर असलेली EMTA ही सध्या MDO म्हणून येथे कार्यरत आहे. सध्या होत असलेल्या कोळसा चोरीत कंपनी मधिल स्थानिक कंपनी व्यवस्थापक सहभागी आहे. या कोळसा चोरी सत्रात आणखी कुणाचा वरदहस्त आहे, याचीही चौकशी आवश्यक आहे. मागील आठ वर्षात या खाणीत झालेल्या कोळसा चोरीची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.