गडचिरोली:-आलापल्ली वनविभागांतर्गत येत असलेल्या पेडिगुडम वनपरिक्षेत्रात विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला.
दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. त्याअनुषंगाने मुलचेरा तालुक्यातील पेडिगुडम वनपरिक्षेत्र कार्यालय मार्फत आज ५ ऑक्टोबर रोजी नामशेष होत असलेल्या वन्य पशुपक्ष्याबाबत जनजागृती करण्यात आले. वन्यजीवांची मानव वस्तीमध्ये येण्याची कारणे, देशातून चित्ता नामशेष कसा झाला व तो भारतात का आणला गेला ? वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या शिकारी आपण कशा थांबविल्या पाहिजेत, वन्य प्राण्यांचे महत्त्व काय ? याबद्दलची माहिती येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भावना आलोने यांनी उपस्थित नागरिक आणि विध्यार्थ्यांना दिली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कपिल हटकर तहसीलदार,मुलचेरा, प्रमुख पाहुणे म्हणून विकास नैताम अध्यक्ष, नगरपंचायत मुलचेरा,अशोक भापकर ठाणेदार मुलचेरा,भावना अलोने वनपरिक्षेत्र अधिकारी मुलचेरा,उमेश पेळूकर नगरसेवक,तपन मल्लिक उप सरपंच ग्रा.प.विवेकानंदपूर, बादल शहा ग्रा.प सदस्य विवेकानंदपूर, सुभाष गणपती माजी प स सदस्य मुलचेरा आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर पेडिगुडम वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी,प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढून जनजागृती केली.मुख्य म्हणजे वन्यजीव सप्ताह निमित्त श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले.
विवेकानंदपुर ते देशबंधुग्राम रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शालेय विद्यार्थी आणि कार्यालयीन कामानिमित्त येणाऱ्या इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.याच रस्त्यावर विविध कार्यालय आणि शाळा,महाविद्यालय असल्याने विध्यार्थी आणि नागरिकांची अडचण लक्षात घेऊन येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भावना अलोने यांनी श्रमदानातून खड्डे बुजवून स्वच्छता अभियानही राबविले. यावेळी पेडिगुडम वन परिक्षेत्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.