कोरची :- तालुक्याच्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी बहुल कोटगुल क्षेत्रातील कोटगुल ते वाको या गावच्या सात किलोमीटर अंतरावरील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्यावर दोन महिन्यातच मोठं-मोठे खड्डे पडल्याने कंत्राटदाराकडून सदर काम निकृष्ट दर्जाचे केले असून या कामाची चौकशी करून सदर डांबरीकरण रस्त्याचे नव्याने मजबूत बांधकाम करण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
देऊळभट्टी पासून २०० मीटरवर येत असलेल्या डांबरीकरण रस्त्यावरील पुलाजवळ मोठं-मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे या ठिकाणी अपघात घडून जीवित हानी होण्याची शक्यता बडावली आहे जर या ठिकाणी अपघात होऊन एखाद्याचे जीव गेल्यास संबंधीत कंत्राटदारच जबाबदार राहणार असून कंत्राटदाराचे परवाना रद्द करून कंत्राटदार व अभियंतावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. शासनाकडून विकास कामासाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे मात्र कंत्राटदार व अभियंताचे संगनमताने अशा निकृष्ट दर्जाचे बांधकामांमुळे भ्रष्टाचार होत असल्याने तालुक्याचे विकास रखडले आहे.
काही महिन्यापूर्वी कोटगुल-ग्यारपत्ती १६ किलोमीटर मार्गाचे डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम करण्यात आले होते आणि ते पंधरा दिवसातच उखडले त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी रस्त्यावरील डांबर-चुरी हातानी बाजूला केल्यावर जुना रस्ता दिसत असल्यामुळे येथील नागरिकांनी कंत्राटदार व अभियंता विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पुन्हा काम करण्यात आले होते.
नुकतेच कोटगुल क्षेत्रातील हजारो नागरिकांनी या क्षेत्रातील विविध समस्याचे निराकरण करण्यासाठी १ सप्टेंबरला छत्तीसगड व महाराष्ट्र राज्यमहामार्गावर चक्काजाम आंदोलनही केला होता तेव्हा या आंदोलस्थळी आरमोरी विधानसभा आमदार कृष्णाजी गजभे यांनी सहा महिन्यात समस्यांचा निवारण करण्याची आंदोलकारिंना ग्वाही दिली होती तसेच कोटगुल क्षेत्रातील करण्यात आलेल्या निकृष्ट बांधकामाची पाहणीसाठी ११ किंवा १२ सप्टेंबरला येणार असल्याचे सांगितले होते.