कोरची :- कोरची पंचायत समिती येथील सभागृहात आज २८ जुलै गुरुवारी सकाळी पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 9 मे 2022, 12 जुलै 2022 व 22 जुलै 2022 ला राज्य निवडणूक आयोग यांनी काढलेल्या जीआरनुसार प्रभाग रस्त्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले. कोरची तालुक्यातील एकूण चार प्रभागासाठी ही आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये अनुसूचित जमातीसाठी ३, अनुसूचित जाती ० व खुल्या प्रवर्गासाठी १ अशी जागा राखीव करण्यात आली. आरक्षणानुसार ५० टक्के महिला आरक्षण मध्ये अनुसूचित जमाती मधून तीन पैकी दोन महिला राखीव असे आरक्षण काढण्यात आले. कोरची तालुक्यात मसेली, कोटगुल, कोचीनारा व बेतकाठी असे चार गण असून मसेली व कोचीनारा येथे अनुसूचित जमाती महिला, कोटगुल येथे अनुसूचित जमाती व बेतकाठी येथे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
सदर आरक्षण सोडत ही नियमाप्रमाणे २०११ च्या जनगणनेनुसार काढण्यात आली. सदर आरक्षण सोडती बद्दल तहसीलदार माळी यांनी सविस्तर माहिती सर्व प्रतिनिधींना दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी व्ही. के. जाधव, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार सोमनाथ माळी, गट विकास अधिकारी राजेश फाये, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. सूर्यवंशी, विस्तार अधिकारी आर. व्ही. कोपुलवार, कोरची तालुका काँग्रेस अध्यक्ष (प्रभारी) मनोज अग्रवाल रामसुराम काटेंगे, सदाराम नरोटे, आशिष अग्रवाल, घनश्याम अग्रवाल गोविंद दरवडे,गिरीजा कोरेटी आदी उपस्थित होते.
१८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी एनव्हीएसपी, पोर्टल हेल्पलाइन या साईटमध्ये ऑनलाइन पद्धतीने नवीन आधार कार्ड व टीसी घेऊन नमुना ६ भरून मतदार यादीत नाव नोंदणी करून घ्यावे, तसेच मृत्यू पावलेल्याचे नमुना ७ भरावे व आपली माहिती, फोटो यामध्ये बदल करायचा असल्यास नमुना ८ तसेच रहिवासी पत्ता मध्ये बदल करायचा असेल तर नमुना ८ अ व आधार कार्ड जोडणी करण्याकरिता नमुना ६ ब फॉर्म भरण्यात यावा असे तहसीलदार सोमनाथ माळी यांनी सांगितले.