नवी दिल्लीत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ७ ऑगस्टला
चंद्रपूर :राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे महाअधिवेशन ताल कटोरा इनडोअर स्टेडियम, नवी दिल्ली येथे ७ ऑगस्टला आयोजित केले आहे. या अधिवेशनाची महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तयारी सुरु आहे.
ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, जनगणनेत निष्पन्न झालेल्या ओबीसी संख्येनुसार संपूर्ण भारतात ओबीसी आरक्षण लागू करण्यात यावे, केंद्र सरकारने 243(T), 243(D) सेक्शन 6 मध्ये बदल करावा, केंद्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन व्हावे, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व्हावे, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळावी, शेतकऱ्यांना शंभर टक्के सबसिडीवर योजना लागू करावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, क्रिमिलियरची मर्यादा वाढवावी, आदी अनेक विषयांवर अधिवेशनात मंथन होणार आहे.
या अधिवेशनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री भूपेश बघेल, मुख्यमंत्री नितीश कुमार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री स्टॅलीन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भगवान कराड, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदींना निमंत्रित केले आहे.
या राष्ट्रीय अधिवेशनाचा प्रमुख उद्देश हा देखील आहे की, या राष्ट्रीय अधिवेशनात देशातील कानाकोपऱ्यातून जे ओबीसी समाज बांधव भगिनी उपस्थित होणार आहेत, त्यांनी ओबीसी समाजाला त्यांचे संपूर्ण हक्क व अधिकार जो पर्यंत प्राप्त होत नाही, तोपर्यंत देशातील शेवटच्या ओबीसी समाज घटकाला जागृत करुण लढण्यासाठी तयार करावे.
या अधिवेशनाला लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजूरकर, समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सहसचिव शरद वानखेडे, महामंत्री मुकेश नंदन यांच्यासह महासंघ, कृती समिती, सेवासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.