चंद्रपूर :- गोंडपिपरी येथील अंबिकानगर वसाहतीमधील सर्व्हे क्रमांक ३६२ मध्ये खुल्या जागेत सर्वांना उपयोगात यावे म्हणून सामाजिक सभागृह बांधण्यात आले.मात्र त्याठिकाणी खाजगी व्यसनमुक्ती केंद्र चालविला जात आहे.सभागृहात चालू करण्यात आलेले व्यसनमुक्ती केंद्र हटवून याठिकाणी सार्वजनिक वाचनालय,व्यायामशाळा सुरू करण्यात यावी,अशी मागणी परिसरातील महिलांनी केली असून त्यासंदर्भात गुरुवारला गोंडपिपरीचे तहसीलदार के.डी.मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
शासकीय नियमानुसार एनए प्लॉट धारकासाठी ओपन स्पेस राखीव ठेवला जातो.याठिकाणी उद्यान,क्रीडांगण,योगशाळा व वाचनालय यासाठी दहा टक्के जागेत बांधकाम आणि उर्वरित खुल्या जागेत बालक व जेष्ठ नागरिकांकरिता बाल उद्यान नियोजित असतो.अशावेळी गोंडपिपरी येथील सर्व्हे न.३६२ मधील एनए लेआऊट वरील ओपनस्पेसच्या दहा टक्के जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सामाजिक सभागृह बांधण्यात आले परंतू या सभागृहात लेआऊटधारकाची परवानगी न घेता खाजगी संस्था परस्पर व्यसनमुक्ती केंद्र चालवित आहे.सदर शासकीय इमारतीचा खाजगी संस्था उपयोग करीत असून त्यांच्या कार्यक्रमामुळे लेआउटधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या परिसरात अरुंद रस्ते आहेत.वाहनाची वर्दळ असल्यामुळे लहान मुलांसंदर्भात अपघात होण्याची शक्यता आहे.व्यसनमुक्ती केंद्राच्या कार्यक्रमामुळे डॉक्टर,इंजिनिअर एमपीएससीच्या तयारीत असलेल्या मुलांना त्रास होत आहे.त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण झाला आहे.त्यामुळे सदर सामाजिक सभागृहात सार्वजनिक वाचनालय,व्यायामशाळा सुरू करीत ते सर्वांसाठी उपयोगात आणावी.उद्याचा उज्वल भारत घडवणारे बालक व त्यांचा शारीरिक विकासाकरिता क्रीडांगण करून द्यावे.ग्रीन जिमचा देखील पर्याय खुला आहे.त्याचवेळी इथे शासकीय नियमानुसार बाल उद्यान तयार करावे.आजच्या या विज्ञान युगात मंदिरापेक्षा क्रीडांगण,वाचनालयास अधिक महत्व देऊन कुलूपबंद असलेले सामाजिक सभागृह खुले करून द्यावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.यासंदर्भातील पत्राच्या प्रतिलिपी राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे तसेच बलारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार,जिल्हाधिकारी चंद्रपूर,नगर पंचायतचे बांधकाम सभापती यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने कुलूप ठोकले
गोंडपिपरी येथील प्लॉटधारकांच्या ओपनस्पेस जागेत सामाजिक सभागृहाची बांधकामाची मागणी करण्यात आली होती.त्यानुसार सभागृहाकरीता निधी सुद्धा मंजूर करण्यात आला.इमारतही पूर्णत्वास आली मात्र सामाजिक सभागृहाऐवजी त्याठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभे केले.रहिवासी प्लॉटधारकांनी सदर प्रकाराची तक्रार नगर पंचायत तथा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.सदर विभागाने याची दखल घेत चौकशी केली व चौकशीनंतर प्रशासनाने सामाजिक सभागृह असलेल्या व्यसनमुक्ती केंद्राच्या इमारतीला कुलूप ठोकले.