वरोरा : पंचायत समिती वरोरा कार्यालयाने लेखा वर्ष २०२२-२३ चा आयकर त्यांच्या पॅनवर जमा न करता परस्पर गहाळ केल्याचे कर्मचा-यांनी काढलेल्या ” २६ – ए. एस. ” वरुन दिसत आहे. मागील वर्षीही कार्यालयाकडून असाच प्रकार घडला होता . याबाबत विचारणा केली असता समर्पक उत्तर मिळाले नाही. मागील वर्षीच्या पगारातून दरमहा कपात केलेला आयकर संबंधितांच्या पॅन नंबरवर जमा केलेला नाही . संबंधितांना रिटर्न फाईल करतेवेळी पगारातून नियमित कपात केली असतांनाही आगावू रक्कम ऑनलाईन भरावी लागत होती . या भ्रष्टाचाराविरोधात अखिल वरोरा शिक्षक संघ आक्रमक झाला असून पोलिसात तक्रार देण्याची परवानगी संवर्ग विकास अधिकारी यांना मागितली आहे .
यावर्षीही कार्यालयाने नियमित दरमहा आयकर कपात करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आयकर त्यांच्या पॅनवर अजूनही जमा केलेला नाही . त्यामुळे नक्कीच पं. स. वरोरा ने कर्मचा-यांच्या पगारातून कपात केलेला सन २०२२-२३ या लेखा वर्षातील आयकर गहाळ किंवा अपहार केलेला आहे .
ही अतिशय गंभीर बाब असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे अखिल वरोरा शिक्षक संघाने संवर्ग विकास अधिकारी वरोरा यांना याविरोधात संघटनेच्या वतिने पोलिसात तक्रार नोंदविण्याची परवानगी मागण्यासाठी निवेदन दिलेले आहे .
आपल्या वरोरा पं. स. तील कर्मचा-यांची संख्या व त्यांच्या पगारातून दरमहा आयकरासाठी कपात केली जाणारी रक्कम ही प्रत्येकी वर्ष अखेरपर्यंत २० ते ३० हजार रुपया पर्यंत असते . संबधित कर्मचा-यांच्या पगारातून कपात झालेली ही रक्कम आयकर विभागाला का पोहचली नाही ? किंवा कुठे गहाळ झाली ? हा आता तपासाचा विषय बनला आहे . या संदर्भात वेळप्रसंगी अखिल वरोरा शिक्षक संघ आंदोलनाचा पवित्रा उचलण्याच्या तयारीत आहे .