वरोरा : चिमूर – वरोरा मार्गाचे काम गेल्या ५ वर्षांपासून अतिशय संथगतीने सुरु आहे. अनेक ठिकाणी पुलाचे काम सुरु आहे. यात चारगाव खुर्द नजीक सुरु असलेल्या पुलाच्या कामामुळे रस्ता पूर्णतः पाण्याखाली आल्याने मार्ग बंद अवस्थेत होता मात्र येथील सामाजिक कार्यकर्ते अभिजित पावडे यांनी कंपनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावताच रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु झाले आहे.
चिमूर – वरोरा मार्ग बनविण्याचे कंत्राट हे एस आर के कंपनीला देण्यात आले आहे. मात्र रस्ता बनविण्याची मुदत संपून सुद्धा अजूनपावेतो हा मार्ग बनविण्यात आला नाही. अर्धवट झालेल्या रस्ताबांधकामामुळे या मार्गावर अनेक अपघात झाले असून काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. पावसाळ्यात या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवास्यांना स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या अर्धवट पुलाच्या कामामुळे रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे रस्तावरील वाहतूक खोळंबली आहे. चारगाव खुर्द नजीक सुद्धा अश्याच एक पुलाचे काम सुरु आहे. पावसामुळे या पुलामध्ये पाणी जमा झाल्याने रस्ताच वाहून गेल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र कंपनीच्या या भोंगळ कारभाराला पेटून उठून चारगाव खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी विविध कार्यकारी संस्थेचे उपसभापती अभिजित पावडे यांनी कंपनीमध्ये जाऊन अधिकाऱ्यांची चांगलीच परेड घेतली व लवकरात लवकर मार्ग सुरु करा असे खडसावून सांगितले. यानंतर लगेचच याठिकाणी सिमेंट पाईप टाकून पाणी जाण्यासाठी मार्ग बनविण्यात आला त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी दशरथ धारकर. लहु देहारकर. सत्यपाल बोरकर. महादेव निकुळे. गोपाल बकरी. संजय डोये. पांडुरंग झाडे. शरद मुळक. मंगेश चवले. प़काश लोडे हे उपस्थित होते.