चंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या विविध प्राधिकरणाच्या 2022 निवडणूकीकरिता आपल्या संकेतस्थळावर मतदारांच्या याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षक यांची माहिती विद्यापीठाद्वारे मागविण्यात आली होती. ही माहिती संलग्नित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी विद्यापीठात सादर करणे आवश्यक होते. मात्र अनेकदा मुदतवाढ देऊनही अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी दिलेल्या मुदतीत ही माहिती विद्यापीठात सादर केली नाही. त्यामुळे अनेक प्राध्यापकांची नावे विद्याशाखा निहाय निर्वाचन गणांच्या मतदार याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आली नाहीत. प्राचार्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा अशा अनेक प्राध्यापकांना भोगावी लागणार असून निवडणूक लढविण्याच्या व मतदान करण्याच्या न्याय हक्कापासून त्यांना वंचित रहावे लागणार आहे. अशा प्राध्यापकांच्या नावाचा मतदार यादीत समावेश करण्यात यावा, व प्राचार्यांनी केलेल्या चुकीसाठी प्राचार्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच, यंग टीचर्स असोसिएशन, नुटा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन या सर्व संघटनांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दिनांक 4 जुलै 2022 ला मा. कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेतही गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी लावून धरली होती. आज दिनांक 16 जुलैला विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या अपिलीय सुनावणीतही गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंचने हा मुद्दा उपस्थित करून कुलगुरूंशी चर्चा केली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे आता नव्याने मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे समाविष्ट करता येणार नाहीत, अशी भूमिका कुलगुरूंनी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने मांडल्याने अनेक प्राध्यापक त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित राहणार आहेत. म्हणून शेवटी सर्व संघटनांच्या वतीने एक निवेदन देऊन यावर तोडगा काढण्याची विनंती केली. याबाबत कायदेशीर बाबी तपासून काय करता येईल याबाबत विचार करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे. शिवाय ज्या प्राचार्यांनी अनवधानाने किंवा जाणीवपूर्वक प्राध्यापकांना मतदानापासून वंचित ठेवले, त्यावर कडक कारवाई करण्याचेही आश्वासन कुलगुरूंनी दिले. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत विविध प्राध्यापक संघटनांचे पदाधिकारी निवेदन देतांना उपस्थित होते.