गडचिरोली:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झालं असून नागपूर वरून गडचिरोली कडे येत असताना आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर काही काळ थांबून प्रत्यक्ष पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर ते पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मागील तीन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तथा अनेक मार्ग बंद असून अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काल दुपारपासून गडचिरोली जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा कहर सुरूच आहे.
अशा परिस्थितीत गडचिरोलीचा पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर वरून गडचिरोलीकडे येत असतानाच आरमोरी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुलावर थांबून त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा सुद्धा घेतला. यावेळी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मिणा आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पाणी पातळी आणि त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली.
रात्री 8:30 वाजता घेणार पत्रकार परिषद
जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गडचिरोली येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन तयारी बाबत आढावा घेणार असल्याची माहिती आहे.