भद्रावती : येथील गौतम नगर येथे नागरिकांना मागील तीन ते चार वर्षापासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आता चंद्रपूर-नागपूर हायवे पासून गौतम नगरला जाणारा मुख्य रस्ता हा गौतम नगर वाशीयांची मुख्य समस्या बनला आहे. हायवे पासून तर बुद्ध विहारापर्यंत हा मुख्य रस्ता फक्त 900 मीटर एवढाच आहे. तरी देखील मागील तीन-चार वर्षापासून याची अत्यंत बिकट अवस्था आहे.गौतम नगरच्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे झाले आहे. आता पावसाळ्यात तर रस्त्यावर तळे साचलेले आहेत. दुचाकी वाहने, पायदळ चालणारे गौतम नगरवासी यांना प्रश्न पडला आहे की, गौतम नगरचा रस्ता गेला कुठे?
नागरिक हा फक्त मतदार राहिलेला आहे. नागरिक म्हणून पाहिजे असलेल्या मूलभूत गरजा, हक्क हे त्याला मागून सुद्धा मिळणे कठीण झाले आहे. पिण्याचे शुद्ध पाणी, चांगला रस्ता, नियमित विजेची सोय, नाल्या, साफसफाई या मूलभूत गरजा आता फक्त निवडणूक आल्यावरच दिसतात. म्हणून आम्हाला नगरसेवक नकोच, असा आवाज जनसामान्यातून उठत आहे. एखादी वार्डाला कोणत्या समस्या आहेत किंवा कोणत्या गोष्टीची गरज आहे, याची विचारणा न करता वार्डाचा किंवा नगराचा विकास कसा केला जातो? गट्टू महत्त्वाचे की रस्ते? हे समजायला खूप अभ्यासाची गरज लागत नाही. तरीदेखील समस्यांचे समाधान सोडून नवीन समस्या उभ्या केल्या जातात.गौतम नगरवासी यांचे नगरपालिकेला या माध्यमातून मागणी आहे की, या समस्यांवर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि नगरवासीयांना मूलभूत सुविधा देण्यात याव्या.