कोरची:- कोरची पंचायत समिती गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकावर असुन अतिसंवेदनशील व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखल्या जातो.तालुक्यात सुरु असलेल्या विकास कामांची गती कासवालाही लाजवेल एवढी असुन अतिदुर्गम भागातील गावे अद्यापही विकासापासुन कोसो दुर आहेत.यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून कोरची पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गावातील समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अशा आशयाचे निवेदन तालुका सरपंच संघटनेच्या पदाधिकारी व शिष्टमंडळाने जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्याकडे केली आहे .
कोरची पंचायत समिती अंतर्गत येणारी गावे अद्यापही समस्याग्रस्त आहेत.गट विकास अधिकारी पद खाली असुन अद्यापही भरण्यात आले नाही.पथ दिव्यांचे वीजबील शासन स्तरावरुन भरण्यात न आल्याने गावे अंधारात आहेत.ग्रामपंचायत मध्ये लावण्यात आलेले नेटवर्क कनेक्शन कुचकामी ठरू लागले आहे.ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले सर्व कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्याने स्थानिक नागरिकांची वेळेवर कोणतेही काम होत नाहीत. या संदर्भात दखल घेऊन तत्काळ संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्या संदर्भात आदेशित करून मुख्यालयी राहण्याचे प्रमाणपञ मिळाल्याशिवाय मासिक वेतन अदा करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदातून करण्यात आली आहे.
दरम्यान शबरी,रमाई, प्रधानमंञी घरकुल आवास योजने अंतर्गत येणारा निधी,रोजगार हमी योजने अंतर्गतचा निधी तत्काळ पंचायत समिती स्तरावर वर्ग करण्यात यावा.सरपंच आणि ग्रामसेवक यांची संयुक्त सभा गट विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पंचायत समिती स्तरावर आयोजीत करण्यात यावी,प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी,नरेगा मधुन होत असलेल्या सार्वजनिक विहीरी,वैयक्तिक सिंचन विहीर व इतर कामांचे निधी तत्काळ पंचायत समितीकडे वर्ग करण्यात यावी,या व इतर मागण्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आल्या आहेत. तर येत्या काही दिवसात या सर्व समस्या मार्गी न लागल्यास प्रसासनविरोधात बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱयांनी निवेदनातुन केला आहे.
निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी यांनी स्विकारले असुन यावेळी गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा नितिन राऊत, जिल्हा उपाध्यक्ष संदीप वरखडे, जिल्हा सचिव पुरूषोत्तम बावने,जिल्हासंघटक चक्रधर नाकाडे,धानोरा सरपंच संघटना तालुका सचिव चेतन सुरपाम,कोरची तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनिराम हिडामी,उपाध्यक्ष परमेश्वर लोहंबरे,सचिव दिलीप केरामी,सुनिल सयाम,ममता साहारे,कौसल्याबाई काटेंगे , बोगा,जांभुळकर आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.