भद्रावती :- “आज शिवाजी महाराजांसारख्या आदर्श महामानवाची गरज निर्माण झालेली आहे. आजच्या तरुण वर्गाला जीवनमूल्ये काय आहे? याची ओळख होणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नाही विचारधारा आहे. राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवाजी महाराजांचा आदर्श तरुण वर्गाने लक्षात घ्यावा” असे विचार प्राचार्य डॉ नामदेव उमाटे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, पर्यावरण विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते.यावेळी मंचावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे, इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉ. जयवंत काकडे यांनी सांगितले की, “आपल्याला शिवाजी महाराजांसारख्या महामानवाच्या कार्यक्रमाची गरज वाटायला लागली आहे. आजच्या युवा पिढीने अशा थोर आदर्श राजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून भविष्याची वाटचाल करायला पाहिजे” असे सांगितले. या कार्यक्रमाचे बहारदार संचालन मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश पारेलवार यांनी केले. आभार प्रगटीकरण डॉ. घोसरे यांनी केले. यावेळी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रकाश तितरे, ग्रंथपाल सुधीर आष्टुनकर, डॉ. यशवंत घुमे, प्रा. रामकृष्ण मालेकर, गणेश गौरकर तथा विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.