भद्रावती :- चंद्रपूर येथे सेल्फ रिस्पेक्ट मुव्हीमेंट तर्फे नुकताच शिवराज्याभिषेक दिन महोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बावीस व्यक्तीचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्व. श्रीनिवासराव मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी दिलेल्या कोरोना संक्रमण कालावधीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोरोना योद्धा म्हणून त्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी कोरोना संक्रमण कालावधीत स्वतःच्या मालकीच्या मंगल कार्यालयात कोविड प्रतिबंधात्मक उपचार केंद्र सुरु केले. या केंद्रावर चंद्रपूरसह यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे दिड हजार रुग्णांनी इलाज घेतला. त्या सर्वांचा भोजन, निवास व औषधोपचाराचा खर्च स्वतः रविंद्र शिंदे यांनी केला. त्याचप्रमाणे भद्रावती व वरोरा तालुक्यातील ग्रामीण व शहरी क्षेत्रात ठिकठिकाणी सॅनीटाईझर व माक्सचे वितरण केले. गोरगरीब व गरजवंतांना एक हात मदतीचा या उपक्रमातून अन्नधान्य किट व अत्यावश्यक वस्तुंचे वितरण केले. कोरोना संक्रमण कालावधीतील सेवाभावी कार्य करतांना रविंद्र शिंदे यांनी शासनाकडून एकही पैश्याचा निधी घेतला नाही.
शिवराज्याभिषेक दिना निमित्य आयोजित कार्यक्रमात व्यासपिठावर अध्यक्षस्थानी बळीराज धोटे, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अशोक राणा ,अँड.दत्ता हजारें, अँड.फरहाद बेग, इंजि .अशोक मस्के, सुधाकर अडबाले, हिराचंद बोरकुटे, अनवरभाई अली, भास्कर मुन, बंडू हजारें, सुभाष शिंदे, राजकुमार जवादे, इंजि. एल .व्ही .घागी , ए. एल. वनकर , प्रा. माधव गुरनुले, पांडुरंग गावतुरे आणि गडकर उपस्थित होते.