भद्रावती :शहरातील आठवडी बाजारात चोरीचे प्रमाण वाढले आहेत. चैन स्नैचिंग, मोबाईल चोरी, वाहन चोरी, पैसे-पर्स चोरी चे प्रकार हमखास आठवडी बाजारात घडतात. याकडे पोलीस विभागाने लक्ष देवून आठवळी बाजारात पोलिसांनी गस्त घालावी व संशयीतांवर लक्ष घालून असावे, अशी मागणी येथील नागरीक करीत आहेत.
शहरात बुधवार या दिवशी आठवडी बाजार भरतो. या दिवशी आसपासच्या खेळ्यातून व बाहेर गावाहून व्यापारी, शेतकरी व्यापार करण्यास शहरात दाखल होतात. शहरातील तथा आयुध निर्माणी, विंजासन, गवराळा, सुमठाना, केसूर्ली, येथील नागरिक मुख्य बाजारपेठेत बाजार करण्यास जातात. त्यामुळे शहरात बुधवार या दिवशी गर्दीचे वातावरण असते. अशा परिस्थितीचा फायदा घेत चोर संधी साधतात व चोरी करतात. यात चैन स्नैचिंग, वाहन चोरी, मोबाईल चोरी, पैसे, पर्स चोरी असे प्रकार हमखास घडतात. काल (दि.१) ला आठवडी बाजारातून चार मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे.
काही मंगल कार्यालयात लग्नसमारंभात देखील चैन स्नैचिंगचे, दागिने चोरीचे प्रकार वाढले आहे.
बाहेर गावाहून येणारे टोळके ज्यात विशेषत: महिला असतात, तर लग्नात लग्न वर्हाडी म्हणून चांगल्या वेशात येणारे चोर, अशा चोऱ्या करून शहरातून निघून जातात, असा अंदाज आहे. सातत्याने आठवडी बाजारात गस्त घालून पाहणी केल्यास संशयीत लक्षात येईल व चोर सापडू शकतील, असे नागरिकांचे म्हणने आहे.